|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन

गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन 

मालवणकॉलेज विद्यार्थी मोहीत झाड याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱया सतीश आचरेकर याला तात्काळ अटक करण्यात यावी आणि पोलीस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी वायरी-भूतनाथ ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधण्यात आले.

ग्रामस्थांनी रास्तारोकोप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अन्यथा 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मालवण पोलीस ठाण्यासमोर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांना दिला आहे. या निवेदनाची प्रत पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, काँग्रेस नेते नारायण राणे, बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, तहसीलदार, पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस उपनिरीक्षक वाघ यांचीच बाजू योग्य असल्याचे शिष्टमंडळाला सांगितल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

रस्तारोको करणाऱया ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने बुधवारी ग्रामस्थांनी भूतनाथ मंदिरात बैठक घेत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच पोलीस उपनिरीक्षक वाघ यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये लक्झरी चालक राजन चव्हाण याला पोलीस ठाण्यात मिळालेल्या वागणुकीचा संदर्भ देण्यात आलेला आहे. तसेच सतीश आचरेकर याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

लोकांचा असंतोष आजमावू नका – भाई गोवेकर

किल्ला झेंडा आंदोलन आजही मालवणच्या जनतेच्या स्मरणात आहे. त्यावेळी पोलिसांनी जनतेचा असंतोष पाहिलेला आहे. सरकार कोणाचेही असो आम्ही, जनतेसाठी लढत राहणार आहोत. पोलिसांची चूक दुर्लक्षीत करण्यासारखी नाही, यामुळेच आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आंदोलनाच्या ठिकाणाहून पालकमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली होती. पोलीस निरीक्षकांनाही पालकमंत्र्यांनी सूचना केलेली होती, असे असताना आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक देत असतील, तर आमच्यातही न्याय हक्कासाठी लढण्याची धमक आहे. पोलिसांनी बंदरजेटीवरील मारहाणप्रकरणात योग्य काळजी न घेतल्यानेच अद्याप संशयित सापडलेले नाहीत, यामुळे पोलिसांनी आधी आपल्या कामात पारदर्शकता आणावी, असा टोला शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी मारला आहे.

Related posts: