|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तर भाजपसाठी यापुढे काम न करण्याचा निर्धार

तर भाजपसाठी यापुढे काम न करण्याचा निर्धार 

प्रतिनिधी/ काणकोण

भारतीय जनता पक्षाची काणकोण मतदारसंघातील उमेदवारी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांना डावलून माजी आमदार विजय पै खोत यांनाच देण्याचे जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे काणकोण भाजप मंडळ, महिला मोर्चा, युवा मोर्चासहित 56 बुथांवरील भाजपाचे क्रियाशील कार्यकर्ते एकदम आक्रमक बनले आहेत. 13 रोजी संध्याकाळी सतत दुसऱया दिवशी तीनशेपेक्षा अधिक क्रियाशील कार्यकर्त्यांनी तवडकर यांच्या निवासस्थानी गर्दी करून यापुढे भाजपसाठी काम न करण्याचा निर्धार केला.

तवडकर यांनी काणकोण मतदारसंघातील बहुजन समाजाला भाजपाचे महत्त्व पटवून देण्याचे महत्त्वाचे काम केले. यापूर्वी दहा वर्षे काणकोण मतदारसंघाचे आमदार भाजपाचे होते. 2012 साली भाजपाचे सरकार आले आणि रमेश तवडकर यांना महत्त्वाची खाती मिळाली. या खात्यांच्या योजनांचा त्यांनी काणकोण मतदारसंघातील गोरगरिबांना कसा लाभ मिळेल याचाच विचार केला. आदिवासी कल्याण खात्याच्या 25 नव्या योजना चालू केल्या. त्यांचा सर्वाधिक लाभ काणकोणच्या आदिवासी समाजाने घेतला. काणकोणचे रवींद्र भवन आणि अन्य जे क्रीडा प्रकल्प लांबणीवर पडले त्यात तवडकर यांचा अजिबात दोष नसून सरकारच्या नियोजनाचा तो परिणाम असल्याचे मत व्यक्त करताना काही कार्यकर्त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

यावेळी काणकोण नगरपालिकेचे नगरसेवक हेमंत ना. गावकर, गुरू कोमरपंत, दयानंद पागी, किशोर शेट, सरपंच वल्लभ टेंगसे, बारकेलो वेळीप, प्रशांत देसाई, पुनो वेळीप, उपसरपंच लक्षावती वेळीप, जिल्हा पंचायत सदस्या डॉ. पुष्पा अय्या, महिला मोर्चाच्या अध्यक्षा विंदा सतरकर, मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक, सचिव विशाल देसाई, उपाध्यक्ष संजय कोमरपंत, खजिनदार सूरज ना. गावकर, माजी सरपंच अशोक वेळीप यांनी आपल्या भावना अशा प्रकारे व्यक्त केल्या की, जणू निर्वाणीचीच सभा आहे की काय असा आभास काही जणांना झाला.

…तर एक दोन – दिवसांत निर्णय

यावेळी बोलताना क्रीडामंत्री तवडकर यांनी कार्यकर्त्यांनी विचलित न होता, धीर आणि संयम न सोडता येणाऱया परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन केले. आपल्या कारकिर्दीत आपण भाजपाची ध्येय – धोरणे सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मात्र उमेदवारीच्या बाबतीत आपल्याला पक्षश्रेष्ठींनी झुलवत ठेवले. आपल्याविरुद्ध ना ना आरोप करण्यात आले. तरी देखील आपण आशा सोडलेली नाही. मात्र काही विपरित घडल्यास येणाऱया एक – दोन दिवसांत आपला निर्णय आपण जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्रीकर समजूत काढणार ?

दरम्यान, काणकोणातील भाजपाचा उमेदवार 15 रोजी जाहीर होणार असून एक – दोन दिवसात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर काणकोण मतदारसंघाला भेट देऊन पक्ष कार्यकर्त्यांची समजूत काढणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्यानंतर काणकोण भाजप मंडळ, महिला मोर्चा आणि युवा मोर्चासहित 56 बुथांवरील कार्यकर्ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दुसऱया बाजूने माजी आमदार विजय पै खोत यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांची एकच गर्दी होत असून कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळविण्याच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करतानाच प्रचाराला सुरुवात केली आहे. 

Related posts: