|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमरिंदर सिंग यांना जे. जे. सिंग यांचे खडे आव्हान

अमरिंदर सिंग यांना जे. जे. सिंग यांचे खडे आव्हान 

विशेष प्रतिनिधी/ चंदीगढ

उत्तर प्रदेश, गोव्याबरोबरच पंजाब विधानसभेची निवडणूकही अटीतटीची होणार असल्याचा रागरंग दिसू लागला आहे.

पतियाळा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अमरिंदर सिंग यांच्या विरोधात अकाली दलाने माजी लष्करप्रमुख जे. जे. सिंग यांची उमेदवारी घोषित केली आहे. अमरिंदर सिंग हे पतियाळा राजघराण्याशी संबंधित असल्याने आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने पतियाळाची लढत चुरशीची होणार, यात शंका नाही.

पंजाबमध्ये अकाली दल-भाजप युती असून या युतीचे उमेदवार म्हणून जे. जे. सिंग रिंगणात उतरणार आहेत. दि. 17 रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या लढतीचे वैशिष्टय़ म्हणजे ‘राजा विरुद्ध प्रजा’ असा रंग येऊ लागला आहे.

सिंग यांचा बेळगावशी संबंध

अमरिंदर सिंग हे पतियाळाच्या राजघराण्याचे आहेत. तर जे. जे. सिंग यांचे आजोबा लष्करात शिपाई होते. तसेच वडील कॅप्टन होते. मात्र, जे. जे. सिंग आपल्या कर्तबगारीने लष्करप्रमुख पदापर्यंत पोहोचले होते. त्यांचा बेळगावशी संबंध म्हणजे ते एमएलआयआरसीचे कमांडंट होते. या पार्श्वभूमीवर त्यांचा बेळगावशी निकटचा संबंध होता आणि अजूनही आहे. हे लक्षात घेऊन ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख आणि ‘लोकमान्य’चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी पतियाळा येथे जाऊन जे. जे. सिंग यांना शुभेच्छा दिल्या. तसेच बेळगाव शहर म. ए. समितीचे अध्यक्ष म्हणूनही किरण ठाकुर यांनी त्यांना सीमाप्रश्नाची पार्श्वभूमी कथन केली. वैशिष्टय़ म्हणजे चंदीगढही पंजाब-हरियाणा सीमाप्रश्नाशी संबंधित आहे. जे. जे. सिंग यांना बेळगावच्या सीमाप्रश्नाबाबत चांगली माहिती आहे.

प्रचार कार्यालयात घेतली भेट

अकाली दल-भाजप युतीच्या पतियाळा येथील प्रचार कार्यालयात जाऊन किरण ठाकुर यांनी जे. जे. सिंग यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अमरावती येथील ‘दै. हिंदुस्थान’चे संपादक विलास मराठे त्यांच्यासमवेत होते. पतियाळा मतदारसंघात 70 टक्के हिंदू असून त्याचा फायदा अकाली दलाला होईल, असा विश्वास वाटतो. याचे कारण म्हणजे भाजप युतीमध्ये आहे. जे. जे. सिंग यांच्या प्रचाराने आतापासूनच वेग घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या कोपरा प्रचार सभांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अकाली दल झिंदाबाद…

‘प्रकाशसिंग बादल झिंदाबाद’, ‘सुखविंदरसिंग झिंदाबाद’, ‘भाजप झिंदाबाद’, ‘जे. जे. सिंग झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे जे. जे. सिंग यांच्या पत्नी अनुपमा यांनीही महिला प्रचार आघाडी हाती घेतली आहे.

अमरिंदर सिंगांचा विश्वास डळमळला

स्वतः जे. जे. सिंग सर्वसामान्य मतदारांची भेट घेत असून त्यांचे प्रश्न समजावून घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये आत्मियता निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय, अमरिंदर सिंग यांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघाबरोबरच आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचा आत्मविश्वास डळमळू लागला आहे. आपण निवडून आलो तर पतियाळा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू, सर्वांचे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही जे. जे. सिंग देत आहेत.