|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपने गोव्याची पाच वर्षे अक्षरश: वाया घालवली

भाजपने गोव्याची पाच वर्षे अक्षरश: वाया घालवली 

प्रतिनिधी/ डिचोली

आपल्याकडे पैसे असल्यास आपण कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो, मात्र वेळ आणि काळ विकत घेऊ शकत नाही. गोव्यात भाजपने गोवेकरांची पाच वर्षे वाया घालवली आहेत. अशा सरकारचा धिक्कार करावा असे वाटते. गेली पाच वर्षे त्यांनी केवळ गोवेकरांची मस्करीच केलेली असून आता त्या मस्करीला माफी नाही. आज त्यांच्याकडे गोव्यात राज्य चालविण्यासाठी सक्षम नेता नाही. अशा परिस्थितीत दिल्लीहून नेता आयात करण्याची भाषा करणाऱया भाजपने त्यापेक्षा सत्ताच सोडावी. लोकांची दिशाभूल व फसवणूक करू नये, असे आव्हान विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी डिचोली येथे केले.

डिचोली येथील सेसा वेदांत कंपनीच्या कामगारांनी आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांचा प्रश्न सोडविण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल डिचोलीत काँग्रेस उमेदवार ऍड. मनोहर शिरोडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. या कार्यक्रमात प्रतापसिंह राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार ऍड. मनोहर शिरोडकर, नझीर बेग, फिरोज बेग, गजनाफर आगा, मानसी शिरोडकर, इंद्रकांत फाळकर, दिनानाथ मुळगावकर आदींची उपस्थिती होती.

गोव्यातील सर्वात निष्क्रिय सरकार भाजप

गेल्या पाच वर्षात गोव्यात केवळ आश्वासनांचा पाऊसच पहायला मिळाला. हातात मात्र निराशाच आली. गोव्यातील 50 हजार नोकऱयांचे आश्वासन कुठे गेले? कूळ मुंडकार कायदा बदलून कोणाचा फायदा केला? केवळ भाटकारांचे हित जपले. तर काही आमदार भाटकार बनले. सेसा कामगारांना सरकारने वाऱयावर सोडले. गोव्याची आर्थिक परिस्थिती संकटात आणली व लोकांची स्थिती केविलवाणी बनविली आहे. हे सरकार गरीब कष्टकरी लोकांचे नसून केवळ आपले  पोट भरण्याचे काम करीत आहे. आम्ही कधी अरेरावी केली नाही तर केवळ राज्याचे कल्याण तसेच देशाच्या प्रगतीसाठी वावरत आहे, असेही प्रतापसिंह राणे यांनी म्हटले.

नोटबंदीमुळे 15 वर्षे मागे : शिरोडकर

गोव्यात व केंद्रातील भाजपने आज केवळ युटर्नचाच सपाटा लावलेला आहे. राज्यातील ही सवय केंद्रानेही अंगीकारली आहे. देशात मोदींनी लावलेल्या नोटबंदीमुळे देशाला 15 वर्षे मागे नेलेले आहे. डिचोलीत आजपर्यंत काँग्रेस पक्षानेच विकास साधलेला असून विरोधी उमेदवार केवळ आपल्यासाठी फुकटचे श्रेय लाटत आहे. त्यातून डिचोलीत काँग्रेसचाच विजय निश्चित असल्याचे यावेळी ऍड. मनोहर शिरोडकर यांनी सांगितले.