|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देस रागातील संदेश संध्याकाळ

देस रागातील संदेश संध्याकाळ 

मालवणयेथील बॅ. नाथ पै सेवांगण आयोजित सुप्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट यांच्या ‘ताणतणाव आणि आपण’ या विषयास अनुसरून झालेल्या प्रकट मुलाखतीस मालवणातील रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दादा शिखरे स्मृती सभागृहात एकच गर्दी केली. लहान मुले आणि शालेय विद्यार्थ्यांपासून ते सेवानिवृत्त व्यक्तींनासुद्धा विविध ताणतणावांना सामोरे जावे लागते. याविषयीच्या प्रश्नांना स्वानुभवातून उत्तरे देताना डॉ. अवचट यांनी उपस्थितांना तणावमुक्तीचा सोपा मार्गच दाखविला.

  आयुष्यात घडणाऱया प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यास उद्भवणाऱया तणावांना आपोआप दूर करता येते. हे साध्या साध्या गोष्टीतून गप्पांच्या ओघात त्यांनी दाखवून दिले. तणावमुक्तीसाठी छंद कितपत उपयोगी पडतात, या प्रश्नावर स्पष्टीकरण करताना त्यांनी आपल्या ओरोगामी, बासरीवादन, लेखन, चित्रकला आणि भटकंती आदी छंदातून तणावमुक्त आयुष्य कसे जगलो, याचा सुरेख असा आलेख श्रोत्यांसमोर मांडला. आपले छंद हे स्वतःपुरतेच राखताना त्याच्यातून प्रसिद्धीचा कधीच हव्यास केला नाही. फक्त लेखन हे आपले अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केल्याने ते वगळता अन्य छंदांनी प्रसिद्धी देण्याची संधी असूनही ते टाळले, असे ते म्हणाले. सुमारे दीड तास चाललेल्या या स्वसंवादात्मक प्रकट मुलाखतीचा शेवट डॉक्टरांनी वेणूवर वाजविलेल्या देस रागाच्या सुरावटीने झाला. एका अविस्मरणीय सायंकाळच्या स्मृती उराशी बाळगीतच रसिकांनी एका लेखकाचा निरोप घेतला. सूत्रसंचालन प्रा. देवदत्त परुळेकर यांनी, तर आभार सेवांगणचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खोबरेकर व ऋतुजा केळकर यांनी मानले.

Related posts: