|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डंपरच्या धडकेने वागदेतील दोघे दुचाकीस्वार गंभीर

डंपरच्या धडकेने वागदेतील दोघे दुचाकीस्वार गंभीर 

कणकवली : कणकवलीहून वागदेच्या दिशेने जाणाऱया मोटारसायकलला समोरून ओव्हरटेक करीत येत असलेल्या डंपरची धडक बसली. धडकेत मोटारसायकलवरील सतीश उर्फ सतू विष्णू गावडे (30) व चंद्रकांत गणेश गोलतकर (43, दोघेही वागदे) हे दोघेही जखमी झाले. हा अपघात वागदे येथील टीव्हीएस शोरुमनजीक मंगळवारी दुपारी तीन वा. च्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश गावडे व चंद्रकांत गोलतकर हे मोटारसायकलने कणकवली येथून वागदेच्या दिशेने जात होते. ते टीव्हीएस शोरुमनजीक आले असता समोरून रिक्षाला ओव्हरटेक करीत येत असलेल्या डंपरची धडक बसली. या धडकेत मोटारसायकलवरील दोघेही महामार्गावर फेकले गेले.

ग्रामस्थांची घटनास्थळी धाव

अपघात घडल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना खासगी वाहनांद्वारे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात सतीशच्या दोन्ही पाय, उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. तर चंद्रकांत याच्याही खांद्याला दुखापत झाली.

मोटारसायकलचे मोठे नुकसान

अपघातात मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले. मोटारसायकलच्या पेट्रोलची टाकी अक्षरशः तुटली. पुढील हेडलाईटही फुटले. तर पुढील टायरचा भाग, हँडलही वाकले होते. घटनास्थळी मोटारसायकलचे तुटलेले पार्ट इतस्ततः पसरले होते.

दरम्यान, दोन्ही जखमींना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलीस स्थानकात नोंद नव्हती.

 

Related posts: