|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यवलूज-पोर्ले बंधाऱयाची गळती थांबवा

यवलूज-पोर्ले बंधाऱयाची गळती थांबवा 

वार्ताहर/ वाघवे

पन्हाळा पश्चिम भागातील कासारी नदीवरील निटवडे येथील कोल्हापूर पध्दतीच्या यवलूज-पोर्ले बंधाऱयातून मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे कासारी नदीचे पात्र वारंवार कोरडे पडत असून, यवलूजपासून वाघवे, पिंपळेपर्यंतच्या 14 ते 15 गावांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, निवटवडे येथील यवलूज-पोर्ले या बंधाऱयाची गळती कायमस्वरूपी थांबवावी व शेतकऱयांना व ग्रामस्थांना पाणीटंचाईपासून वाचवावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे विभागाचे एक्झीकेटीव्ह इंजिनिअर विजय पाटील यांना देण्यात आले.

यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य व कोल्हापूर जिल्हा माजी बांधकाम व आरोग्य सभापती के. एस. चौगले, शाहूवाडी-पन्हाळा भाजपाचे विधानसभा अध्यक्ष अजितसिंह काटकर, भरत मोरे, शिवाजी पाटील, संग्राम पाटील, माजगावचे सरपंच जीवन पाटील, प्रकाश रणदिवे, वाघवेचे माजी सरपंच बाजीराव उदाळे, सर्जेराव सुर्वे, माळवाडीचे सरपंच जयवंत गुजर, तंटामुक्त अध्यक्ष यवलूज रंगराव पाटील, विक्रम महाडिक, सुरेश खोत, दशरथ देसाई आदी उपस्थित होते.

पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीवरील यवलूज-पोर्ले बंधाऱयाच्या पाणलोट क्षेत्रात यवलूज, पडळ, सातार्डे, माजगाव, माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, पिंपळे तर्फ ठाणे, वाघवे व वाडय़ा, गोलिवडे, उत्रे, पार्ले, गुडे, आळवे, देवठाणे क. ठाणेसह वाडय़ावस्त्या या धरणक्षेत्रात येतात.

गेले 3 ते 4 वर्षे झाले या बंधाऱयाला गळती  लागल्यामुळे कासारी नदीचे पात्र वारंवार कोरडे पडत आहे. त्यामुळे शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने गत हंगामासारखी दुष्काळसदृश्य परिस्थिती होणार नाही म्हणून शेतकऱयांनी ऊस पिकांची मोठय़ा प्रमाणात लागवड केली आहे. शेतीपिकांची बऱयापैकी वाढ झाल्याने व मुबलक पाण्यामुळे रासायनिक खतांचा डोस दिला आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी उन्हाळय़ात मुबलक पाण्याची आवश्यकता असते. पण कासारी नदीचे पात्र वारंवार कोरडे पडत असल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासणार आहे. तरी या बंधाऱयाची गळती कायमस्वरूपी थांबवून शेतकऱयांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर के. एस. चौगले, भरत मोरे, अजितसिंह काटकर, शिवाजी पाटील, सुरेश खोत, ओंकार रणदिवे, संदीप आडनाईक, महादेव गोसावी, बाजीराव उदाळे, सर्जेराव सुर्वे, जीवन पाटील, जयवंत गुजर, संग्राम पाटील, बळवंत पाटील, मधुकर चौगले, रंगराव पाटील, संदीप पाटील, संतोष पाटील, विजय आडनाईक यांच्या सहय़ा आहेत.