|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणीच्या निलेशचा एमपीएससीत झेंडा

निपाणीच्या निलेशचा एमपीएससीत झेंडा 

प्रतिनिधी /निपाणी :

मूळचे निपाणी व सध्या कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेले ऍड. निलेश अशोकराव रणदिवे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत न्यायाधिशपदी निवड झाली. दुसऱयाच प्रयत्नात मिळालेल्या या यशाने ऍड. रणदिवे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

निपाणीतील प्रसिद्ध लाकूड व्यापारी दिवंगत नकुळराव रणदिवे यांचा नातू असलेल्या ऍड. निलेश रणदिवे यांचे संपूर्ण शिक्षण कोल्हापुरातच झाले. कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर गेल्या 9 वर्षापासून ते कोल्हापूर जिल्हा न्यायालयात वकिली सेवा बजावत आहेत. याचदरम्यान उच्च ध्येय डोळय़ासमोर ठेवलेल्या निलेश यांनी 2015 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी परीक्षा दिली.

यावेळी यशाने त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली. मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यास करून 2016 साली पुन्हा या पदासाठी परीक्षा दिली. दुसऱयावेळी झालेल्या या प्रयत्नात मात्र त्यांना घवघवीत यश मिळाले. यावेळी सदर पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रात 1500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये 130 जणांची न्यायाधिश पदासाठी निवड करण्यात आली. कोल्हापूर जिल्हय़ातून निवड झालेल्या 4 जणांमध्ये ऍड. निलेश यांचा समावेश असल्याने निपाणीच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आपल्या यशाबाबत बोलताना ऍड. निलेश रणदिवे म्हणाले, ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न सुरू ठेवल्यास यश निश्चित मिळते याचा अनुभव या निवडीमुळे मिळाला आहे. एलएलबीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वकीली व्यवसायाबरोबरच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदापर्यंत जाता येते हे लक्षात ठेवून प्रयत्न केल्यास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले.

दरम्यान सदर निवडीमुळे ऍड. निलेश यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमित रणदिवे, शौकत मणेर, संदीप वाडकर, अनिल भोसले आदी उपस्थित होते. निलेश यांनी वडील ऍड. अशोकराव रणदिवे यांच्यासह आई, पत्नी व सहकाऱयांचे मार्गदर्शन लाभले.

Related posts: