|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वेदगंगेत पाणी, निपाणीकरांना दिलासा

वेदगंगेत पाणी, निपाणीकरांना दिलासा 

प्रतिनिधी / निपाणी

गेल्या दोन आठवडय़ांपासून कोरडय़ा असलेल्या वेदगंगा नदीला बुधवार 12 रोजी दुपारी पाणी आले. यामुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः निपाणीकरांना दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी खालावत चाललेली जवाहर तलावाची पाणीपातळी यामुळे वाढण्यास मदत होणार आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच वेदगंगा नदी कोरडी पडल्याने नागरिकांसह शेतकऱयांमध्ये चिंता व्यक्त होत होती. निपाणीमध्ये तर याचा मोठा परिणाम जाणवला. नदी कोरडी पडल्याने येथून जवाहर तलावात होणारा पाणी उपसा थांबला होता. यातच वाढत्या उष्णतेमुळे तलावाची पाणीपातळी झपाटय़ाने घटत होती. परिणामी शहरात चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागला आहे.

शहर व परिसरातील नागरिकांची पाण्याअभावी होणारी परिस्थिती लक्षात घेऊन आमदार शशिकला जोल्ले यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाने निढोरी टाकी, नाला, चिखली, बस्तवडे बंधाऱयाची पाहणी करून पाणी सोडण्याची मागणी केली होती. यावेळी काही ठिकाणी कालव्यास असलेल्या गळतीची दुरुस्ती करून पाणी सोडण्यात आले असल्याचे महाराष्ट्राच्या पाटबंधारे अधिकाऱयांनी सांगितले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी वेदगंगेत पाणी दाखल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

सुरळीत पाणी पुरवठय़ाची शक्यता

असे असले तरी हेस्कॉमतर्फे टीसीवरील फ्युजा काढण्यात आल्याने सदर पाणी शेतीसाठी न वापरता केवळ पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे. वेदगंगा नदी पुन्हा दुथडी झाल्याने जवाहर तलावातील पाणीसाठाही वाढणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.