|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काबुलमध्ये आत्मघाती हल्ला, 28 ठार

काबुलमध्ये आत्मघाती हल्ला, 28 ठार 

42 जण जखमी  : 2 महिन्यांच्या कालावधीत दुसरा मोठा हल्ला

वृत्तसंस्था/ काबुल

 अफगाणिस्तानच्या राजधानीतील गुलाई दावा खाना भागात सोमवारी झालेल्या कारबॉम्ब स्फोटात 28 जणांना जीव गमवावा लागला. तर हल्ल्यात 42 जण जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या स्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढू शकतो असे पोलीस अधिकाऱयाने म्हटले. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. काबुल शहरात मागील दोन महिन्यात झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. या अगोदर 31 मे रोजी भारतीय दूतावासानजीक झालेल्या स्फोटात 90 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

सोमवारी झालेला स्फोट अफगाणचे खासदार मोहम्मद मोहाकिक यांच्या निवासस्थानानजीक झाल्याचे सांगण्यात आले. मोहाकिक पीपल्स इस्लामिक युनिटी पार्टीचे संस्थापक आहेत. पोलिसांनुसार हा एक आत्मघाती कारबॉम्ब स्फोट होता, जो एका दहशतवाद्याने घडवून आणला.

या स्फोटाचे नेमके लक्ष्य कोण होते हे अजून स्पष्ट झालेले नाही. स्फोट झालेल्या ठिकाणी मोठय़ा संख्येने शिया हजारा समुदायाचे वास्तव्य आहे. एक वर्षाअगोदर याच भागात झालेल्या स्फोटात या समुदायाचे कित्येकजण मारले गेले होते. तेव्हा त्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती.

तालिबानच्या हल्ल्यात 35 जण ठार

अफगाणच्या घोर प्रांताच्या ग्रामीण भागातील एका रुग्णालयावर तालिबानने केला. या हल्ल्यात 35 जण मारले गेले. हा हल्ला शनिवारी झाला असला तरी याची माहिती सोमवारी समोर आली. मारले गेलेले सर्व 35 जण सामान्य नागरिक होते. तालिबानच्या प्रवक्त्याने हल्ल्याची थेट जबाबदारी स्वीकारली नसली तर सैन्यासोबतच्या लढाईत रुग्णालयाला नुकसान पोहोचल्याचे मान्य केले.