|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बेपत्ता 39 भारतीयांचा शोध सुरूच : स्वराज

बेपत्ता 39 भारतीयांचा शोध सुरूच : स्वराज 

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था :

इराकच्या मोसूल येथून 3 वर्षांअगोदर बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांचा शोध अजून बंद करण्यात आलेला नाही. ज्या स्रोतांकडून त्यांच्याविषयी माहिती मिळाली, त्यात इराकचे अध्यक्ष आणि अन्य देशाच्या विदेश मंत्र्याचा समावेश असल्याचे वक्तव्य विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी राज्यसभेत केले. त्याचबरोबर गोपनीय प्रकरण असल्याचा हवाला देत त्यांनी यामागचा स्रोत सांगण्यास नकार दिला.

बेपत्ता भारतीय जिवंत किंवा मारले गेल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही असे स्वराज यांनी संसदेत स्पष्ट केले. राज्यसभेत हा मुद्दा काँग्रेसचे खासदार प्रतापसिंग बाजवा यांनी उपस्थित केला होता. मोसूलमध्ये बेपत्ता झालेल्या भारतीयांचा शोध घेतला जात आहे. सूत्रांनुसार बेपत्ता नागरिक मारले गेलेले नाहीत. ते सर्व सुखरुप परतावेत यासाठी मी प्रार्थना करते असे स्वराज राज्यसभेत शुन्यप्रहरावेळी म्हणाल्या.

विरोधकांचा आरोप फेटाळला

स्वराज यांनी याप्रकरणावरून देशाची दिशाभूल केल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळला. मी कधीच ते जिवंत असल्याचे किंवा मारले गेल्याचे म्हटले नाही. इराकचे विदेशमंत्री काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. त्यांनी आता जी माहिती दिली जाईल, ती पुराव्यासह देऊ असे आश्वासन दिले आहे, असे स्वराज यांनी सांगितले.

राजकारण नको

स्वराज यांनी मोसूलमध्ये बेपत्ता नागरिकांच्या मुद्यावरून राजकारण न करण्याची विनंती विरोधकांना केली. इराक सरकारने 9 जुलै रोजी इस्लामिक स्टेटकडून मोसूल मुक्त करविल्याची घोषणा केली होती. त्याच्या दुसऱयाच दिवशी विदेशी राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांना तेथे पाठविण्यात आले. भारतीयांना मोसूलमध्येच पकडण्यात आले होते. 2016 च्या प्रारंभी ते बादुशच्या कारागृहात होते, यानंतर त्यांच्याविषयी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे स्वराज म्हणाल्या.

हरजीत करतोय दिशाभूल

याप्रकरणी हरजीत मसीह याच्याशी आपले बोलणे झाले आहे. इराकमध्ये 40 जणांना ओलीस ठेवण्यात आले होते, त्यांना जंगलात नेऊन गोळ्या घालण्यात आल्या, आपण कसेबसे वाचल्याचे हरजीतने सांगितले होते. परंतु कसा वाचलो याची माहिती देण्यास हरजीत टाळाटाळ करत असून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय असा दावा विदेशमंत्र्यांनी केला. मोसूलमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांमध्ये हरजीतचा समावेश होता.

Related posts: