|Thursday, January 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » परंपरेच्या कोंदणातील नात्यांची कथा घाडगे ऍण्ड सूनमध्ये

परंपरेच्या कोंदणातील नात्यांची कथा घाडगे ऍण्ड सूनमध्ये 

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नं, ज्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. नवीन नात्यांसोबत येणाऱया अपेक्षा, बंधनं, कुटुंबाची परंपरा जपत सासरच्या सदस्यांच्या मनात तिला स्वत:चं एक अढळ स्थान निर्माण करायचं असतं. अशीच एक सामान्य घरातून आलेली मुलगी परंपरा आणि रुढींमध्ये अडकलेल्या सासरला कसं आपलसं करून घेईल? हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे कलर्स मराठीच्या नव्या मालिकेमध्ये. टेल अ टेल मीडिया निर्मित (जितेंद्र गुप्ता आणि महेश तागडे) परंपरेच्या कोंदणात नात्यांची रंगत या कथासूत्रावर आधारित घाडगे-सून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे 14 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. प्रभावशाली संवादफेक आणि त्याला उत्कृष्ट अभिनय जोड असलेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने मालिकेमध्ये माई घाडगे ही व्यक्तिरेखा साकारणार असून त्यांच्यासोबत अतिशा नाईक, चिन्मय उदगीरकर आणि निवोदित भाग्यश्री लिमये, उदय सबनीस, प्रफुल्ल सामंत प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

घरातील बायकांनी चूल-मूल सांभाळावं, त्यांनी नोकरी करू नये असा समज असलेले घाडगे कुटुंब ज्या घरामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे. घाडगे कुटुंबाचा वडिलोपार्जित दागिन्यांचा व्यवसाय आहे तो म्हणजे घाडगे ऍण्ड सन, ज्याचा कारभार घरातील पुरुष मंडळी सांभाळत आहेत. कुटुंबाची सर्वेसर्वा स्वभावाने कणखर, परंपरेचा पगडा घेऊन आयुष्यभर जगलेली, स्पष्टवक्ती, जिच्या शब्दाला संपूर्ण घर मान देते, जिचे आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे अशी आजी म्हणजे माई घाडगे. तसेच दुसऱया बाजूला अमफता प्रभुणे जी आताच्या युगातली कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे. तिचं लग्न माई घाडगे यांच्या नातवाशी म्हणजेच अक्षय घाडगे याच्याशी होतं. जो अतिशय गोंधळलेला, जुन्या विचारांच्या कुटंबामध्ये पार अडकून गेलेला आहे. या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नाही. कारण दोघांचीही स्वप्नं, ध्येय वेगळी आहेत, तरीही हे दोघं लग्नबंधनात अडकतात. आता या कुटुंबामध्ये लग्न होऊन आल्यावर कशी अमफता माई घाडगे  म्हणजेच आपल्या आजीसासूचं मन जिंकते, कसं त्या परिवाराला आपलंसं करते, त्यांचं मतपरिवर्तन करते आणि ज्या परिवारात बायकांनी नोकरी करणे, व्यवसाय सांभाळणे मान्य नाही त्या घराचा वडिलोपार्जित व्यवसाय ती कशी सांभाळते, कसा त्यांचा व्यवसाय पुढे नेते, हे बघणं नक्कीच रंजक असणार आहे. घाडगे ऍण्ड सन ते घाडगे ऍण्ड सून होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे घाडगे ऍण्ड सून ज्यामध्ये नातं सून आणि आजीसासूचं एक वेगळं नातं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Related posts: