|Friday, April 19, 2019
You are here: Home » क्रिडा » अम्बाती रायुडूची चक्क ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की, व्हीडिओही व्हायरल

अम्बाती रायुडूची चक्क ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की, व्हीडिओही व्हायरल 

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

‘जेंटलमन्स गेम’ अर्थात, सभ्य गृहस्थांचा खेळ मानल्या जाणाऱया क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱया अम्बाती रायुडूने शुक्रवारी किरकोळ कारणावरुन चक्क एका ज्येष्ठ नागरिकाशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली आणि त्याचा हा ‘दुसरा चेहरा’ सोशल मीडियावरुन चांगलाच व्हायरल झाला. रायुडूने भारतीय संघातर्फे 34 वनडे व 6 टी-20 सामने खेळले असून याशिवाय, 2017 मध्ये आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघातही त्याचा समावेश राहिला आहे. या घटनेने मात्र अर्थातच त्याची प्रतिमा डागाळली गेली आहे.

  शुक्रवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमनजीक ही धक्काबुक्की झाली, त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी चित्रित केलेला या घटनेचा व्हीडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, रायुडू स्वैर कार चालवत होता आणि तो ज्यावेळी थांबला, त्यावेळी तेथील एका ज्येष्ठाने याबाबत समज दिल्यानंतर रायुडूचा पारा अचानक चढला व त्याने काही अपशब्दही उच्चारले.

व्हायरल झालेल्या व्हीडिओत रायुडू सदर ज्येष्ठाला शिवीगाळ करत असताना आणि धक्काबुक्की करत असताना स्पष्टपणे दिसून आले. अगदी त्या ज्येष्ठाने देखील प्रत्युत्तर म्हणून रायुडूला धक्का दिला, हे देखील स्पष्ट झाले. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱया खेळाडूने अशा प्रकारे खालच्या पातळीवर उतरत ज्येष्ठाचा अपमान करणे अगदी त्या खेळाडूसाठी देखील कोणत्याच पातळीवर समर्थनीय ठरणार नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया या घटनेचा व्हीडिओ अपलोड करणाऱया बी. विजय याने व्यक्त केली.

 सध्या फॉर्ममध्ये नसल्याने अम्बाती रायुडू मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला असून जून 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत त्याने शेवटचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीत्व केले आहे. मध्यफळीतील हा अनुभवी फलंदाज प्रसंगी यष्टीरक्षणाची धुराही सांभाळू शकतो. अर्थात, एखाद्या दिग्गज खेळाडूने स्वैर गाडी चालवून वाद ओढवून घेण्याची ही पहिली वेळ अजिबात नाही. यापूर्वी, नवज्योत सिंग सिद्धू, वेंकटेश प्रसाद यांच्यावर भारतात तर शेन वॉर्न, वासिम अक्रम यांच्यावर विदेशात अशी नामुष्की आली होती. 2006 मध्ये नवज्योत सिंग सिद्धू व त्याच्या काही मित्रांना पंजाब व हरियाणा न्यायालयाने मनुष्यवधाच्या गंभीर आरोपावरुन दोषी जाहीर केले होते. 1988 मध्ये ही घटना घडली, त्यावेळी त्यात गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला होता. अलीकडे, 2013 मध्ये माजी मध्यमगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद व माजी आमदार एलआर शिवरामे गौडा यांच्यात रस्त्यात अडथळा आणल्याप्रकरणावरुन कायदेशीर लढाई झडली होती.

याशिवाय, शेन वॉर्नने एका किरकोळ अपघातानंतर सायकलस्वाराशी जोरदार हुज्जत घालत आपल्या स्वभावाची काळी बाजू दाखवून दिली होती तर वासिम अक्रमच्या कार टायर्सवर एकदा गोळय़ा झाडल्या गेल्याने एकच खळबळ उडाली होती. अम्बाती रायुडूने ज्येष्ठाशी हुज्जत घालत नव्या वादंगाला सुरुवात केल्यानंतर या सर्व घटनांना उजाळा मिळाला आहे.

Related posts: