|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘एमआयडीसी’ अधिकाऱयांचे ‘जम्बो’ पथक आज नाणारला

‘एमआयडीसी’ अधिकाऱयांचे ‘जम्बो’ पथक आज नाणारला 

दोन दिवसांच्या जिल्हा दौऱयात लोटे, मार्गताम्हाणे, आरजीपीपीएलची पाहणी

लोटे उद्योजकांच्या मागण्यांना मान्यता

प्रतिनिधी /चिपळूण

जिल्हय़ातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीसह गुहागर येथील आरजीपीपीएल, प्रस्तावित असलेली मार्गताम्हाणे, विस्तारित लोटे आणि राजापूर येथील नाणार येथील रिफायनरी प्रकल्प जागेच्या पाहणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठींसह वरिष्ठ अधिकाऱयांचे जम्बो पथक गुरूवारपासून जिल्हा दौऱयावर आले आहे. शुक्रवारी सकाळी हे अधिकारी नाणारला जाणार आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांच्यासह सहमुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे, अधीक्षक अभियंता राजेश झंझाळ, रत्नागिरी प्रादेशिक अधिकारी ढोंबरे, कार्यकारी अभियंता राक्षे यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱयांनी गुरूवारी सकाळी विस्तारित लोटेसह औद्योगिक वसाहतीची पाहणी केली. यावेळी लोटे येथे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्याहस्ते सेठी यांच्यासह अधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उद्योजक संघटनेच्यावतीने अध्यक्ष डॉ. पटवर्धन यांनी रत्नागिरीला पूर्णवेळ रिजनल ऑफिसरची नेमणूक, कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय चिपळूण येथे सुरू करावे, भूखंड विकास कालावधीबाबत धोरणात बदल करावा, मोकळय़ा क्षेत्रावरील वृक्ष लागवडीसाठी पाणीपुरवठा मोफत करावा, अतिरिक्त लोटे परशुरामसाठी जलशुद्धीकरण केंद्र मंजूर करावे, लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला नियमित पाणीपुरवठा करावा, स्टॉम वॉटरची व्यवस्था करावी, रस्त्याचे फायनल अस्पालटींग चांगल्या दर्जाचे करावे, कम्युनिटी हिट अंड पॉवर सेंटरसाठी प्रोत्साहन द्यावे, इंटरनॅशनल कारगो डेपोसाठी पुढाकार घ्यावा, फायर नाहरकत दाखल्याची पद्धत सोपी करावी, नियोजित ‘ट्रक टर्मिनल’साठी मोफत जागा द्यावी, मोकळय़ा जागेवरील कर आकारणी रद्द करावी, नैसर्गिक विधीसाठी व्यवस्था करावी, लोटे परशुराममधील रद्द झालेले भूखंड उद्योजकांना परत द्यावेत, अशा मागण्या केल्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सेठी यांनी लोटे परशुरामच्या प्रश्नासंदर्भात पुढील घोषणा केल्या. रत्नागिरीसाठी पूर्णवेळ रिजनल ऑफीसची नेमणूक लवकरात-लवकर करण्यात येईल. कार्यकारी अभियंता कार्यालयाबाबत योग्य निर्णय घेऊन उद्योजकांची गैरसोय होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येईल. मुदतवाढ कालावधी वाढवण्याबाबत व धोरणात बदल करण्याबाबत उद्योजकांना आवश्यक कालावधी देण्यात येईल. 24 दशलक्ष क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्राचे काम लवकरच सुरू होईल, वालोपे येथू पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ती व्यवस्था तयार करू, स्टॉम वॉटरसाठी आवश्यक कामे लवकरच सुरू करण्यात येईल. कम्युनिटी हिट अंड पॉवर सेंटरच्या माध्यमातून सामूहिक स्टीम जनरेशन व पॉवर जनरेशनसाठी सहकार्य देऊ, ट्रक टर्मिनलसाठी औद्योगिक विकास महामंडळ जागा उपलब्ध करून देईल, असे आश्वासन दिले.

यावेळी उद्योजक संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश पाटणकर, सचिव ऍड.राज आंब्रे, सहसचिव मिलिंद बारटक्के, खजिनदार राजीव जांभेकर, संचालक सूर्यकांत वडके, संजय घाग, कुंदन मोरे, संतोष कदम, अरविंद म्हात्रे, शिरीष चौधरी, संगीता ओतारी, दीपक लाड, दत्तात्रय जाधव, हेमंत आपटे, अनिल भोसले, किसन चव्हाण, चंद्रकांत वारूनगसे, सचिन खरे, हेमंत डांगे, अरविंद जोशी, स्वरूप शिर्पे आदी उद्योजक व कंपन्याचे व्यवस्थापक उपस्थित होते. दरम्यान, गुरूवारी या वरिष्ठ अधिकाऱयांनी मार्गताम्हाणे, आरजीपीपीएलला भेट दिली. शुक्रवारी ते नाणार येथे जाणार असून त्यानंतर सिंधुदुर्गच्या दौऱयावर जाणार आहेत.

दौऱयाकडे जिल्हय़ाचे लक्ष

दरम्यान, नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा झालेला विरोध, मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केलेला निषेध आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्त, लोकप्रतिनिधींची घेतलेली बैठक या पार्श्वभूमीवर शुक्रवारी एमआयडीसी वरिष्ठ अधिकाऱयांचा होणारा दौरा महत्वपूर्ण असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.