|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नाटय़पंढरीला पुन्हा वैभव आणण्यासाठी प्रयत्न करूया

नाटय़पंढरीला पुन्हा वैभव आणण्यासाठी प्रयत्न करूया 

प्रतिनिधी/ सांगली

नाटय़पंढरीमध्ये पूर्वी रंगमंच व नाटय़गृह भरलेले असे. तेच पूर्वीचे नाटय़पंढरीचे सांस्कृतिक वैभव पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच नाटय़ कलाकारांना अद्ययावत व सुसज्ज रंगमंच उपलब्ध करुन देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून, त्यासाठी शासनाचे आराखडे तयार करण्याचे काम सुरु आहे. सर्व कलाकारांच्या सहकार्याने या माध्यमातून सांगली पुन्हा नाटय़पंढरी व्हावी यासाठी आपण सारेच प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन आम. सुधीर गाडगीळ यांनी केले.

  अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, शाखा सांगली तर्फे विष्णुदास भावे नाटय़गृह येथे आयोजित पीएनजी महाकरंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. शरद कराळे उपस्थित होते. आम. गाडगीळ म्हणाले, या एकांकिका स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यासाठी या स्पर्धेत आता सिंधुदूर्ग व रत्नागिरी या जिल्हय़ांचाही समावेश करावा. त्यासाठी मानधन वाढवण्याचाही प्रयत्न करणार असून, स्पर्धा व्यापक स्वरुपात होतील, याकडेही  लक्ष पुरवले जाईल, अशी आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

  स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग, सांगलीचे कॉलगर्ल, सदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडचे ब्लड ग्रुप ऑफ शिवाजी पॉझिटिव्ह, डीकेटीई अभियांत्रिकी महाविद्यालयचे माणसापरास मेंढरं बरी व विलिंग्डन महाविद्यालय सांगलीचे शक्यतांचा कोलाज या चार एकांकिका सादर झाल्या. त्यांना प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वागत चेतना वैद्य यांनी तर आभार श्रीनिवास जरंडीकर यांनी मानले. यावेळी मुकुंद पटवर्धन, प्राचार्य भास्कर ताम्हनकर, सनित कुलकर्णी, भालचंद्र चितळे, डॉ. दयानंद नाईक, प्रसाद बर्वे, विजय कडणे, विनायक केळकर, चंद्रकांत धामणीकर उपस्थित होते.

आजवर अनेक ठिकाणी एकांकिका सादरीकरण केले. पण, येथील अनुभव छान होता. संयोजन निटनेटके होते. ग्रामीण भागातही चांगले कलाकार असून, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम या स्पर्धेने केले आहे, अशी प्रतिक्रिया कराड येथील धनश्री कोलते यांनी व्यक्त केली.

एकांकिका स्पर्धा प्रतिवर्षी व्हाव्यात, यातून विद्यार्थ्यांना खूप काही चांगले शिकायला, अनुभवयाला मिळते आहे. असे सांस्कृतिक उपक्रम झाले, तरच नाटय़चळवळ टिकून राहिल. संयोजनासह सर्व काही नेटके असल्याने प्रत्येकाला छान वाव मिळतोय. त्यामुळे जिंकलो नाही तरी चालेल, पण अनुभव छान मिळाला, यातच समाधान आहे. तसेच प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद व दाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया सांगलीच्या हर्षवर्धन काळे यांनी व्यक्त केली.

 आज होणाऱया एकांकिका : श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय ‘मॅडम’, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली ‘देवबाभळी’, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी ‘पाझर’, नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज सांगली ‘अभंग’, विश्वेश्वरय्या टेक्निकल कॅम्पस पाटगाव ‘हत्ती इलो’, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली ‘विवर’, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर ‘पाझर’ व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर ‘टय़ूशन’.