|Sunday, July 22, 2018
You are here: Home » Top News » नर्मदा प्रकल्प म्हणजे विकासाचे विकृतीकरण : मेधा पाटकर

नर्मदा प्रकल्प म्हणजे विकासाचे विकृतीकरण : मेधा पाटकर 

पुणे / प्रतिनिधी :

नर्मदा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसून, तेथे फक्त टोल नाका बांधण्यात आलेला आहे. रस्तादेखील अजून पूर्ण झालेला नसताना त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. फक्त आर्थिक आणि राजकीय स्वार्थासाठी हा अट्टाहास असून, यात सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांनादेखील दुर्लक्षित करण्यात आले आहे. हा प्रकल्प म्हणजे पंतप्रधान मोदींचे विकासाचे विकृतीकरण असल्याची टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली.

याबाबत बोलताना पाटकर म्हणाल्या, नर्मदा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ फ्लॉप झाला आहे. उद्घाटनाला सर्व मुख्यमंत्र्यांना बोलविणार, असे मोदींनी आधी सांगितले होते. परंतु ते काही झाले नाही. उलट एक हजारहून अधिक विस्थापितांना अटक करूनच त्यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पुढे जावे लागले. कारण त्यांचे हेलिकॉप्टर तेथे पोहोचलेच नाही. याला दोन्ही राज्यातील लोकांनी 10 वर्षांपूर्वीच विरोध केला होता. त्यावेळी त्यांचे म्हणणेदेखील तेच होते आणि आजही तेच आहे. या भागातील सर्व लोकांचे पुनर्वसन शक्य नसून, यामुळे पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होईल. तसेच या लोकांना त्यांच्या जमिनीची भरपाई देणेदेखील शक्य नाही. पंतप्रधान मोदी जे म्हणत आहेत, ते कोणत्या आधारावर बोलत आहेत. हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे.

महाराष्ट्रातदेखील अद्याप शेकडो लोकांचे पुर्नवसन होणे बाकी आहे. याबाबत दर आठवडय़ाला चर्चा सुरू आहेत. जमीन खरेदी करणे सुरू असून, त्याचे भू-संपादन बाकी आहे. चर्चा करून संवादातून आम्ही मुद्दे सोडवत आहोत. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये अजूनदेखील जमिनी घेतल्या जात आहेत. म्हणून तेथील लोकांनी संघर्ष सुरू केला आहे. सरकारने लिखित आश्वासन पाळले नाही. सरकारच्या या गोष्टी फक्त कॉर्पोरेट आणि राजकीय स्वार्थासाठी सुरू आहेत. यासाठी त्यांचे घाईगडबडीत घोषणा करणे सुरू आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन केले जात नाही. या पाण्याखाली समृद्ध अशी अनेक जिवंत गावे जात आहेत. सुप्रिम कोर्टाने अनेकांना 15 ते 60 लाखांचे पॅकेज देण्यास सांगितले. तेदेखील अर्ध्या लोकांनाच देण्यात आले आहे. पर्यावरणीय आणि सामाजिक मुद्दय़ांना हरताळ फासण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

गावात पाणी भरल्यास लोकांचा आक्रोश होईल.

कोर्टाने 31 जुलैपर्यंत जागा खाली करण्याचे आदेश दिले असले, तरी पुनर्वसनाची कामे पूर्ण झालेली नाहीत. कोटय़वधींचा खर्च करून टिनशेड बांधण्यात आले आहेत. पण या गोष्टी तात्पुरत्या आहेत. यात भ्रष्टाचाराचे मोठे लोण पसरविण्यात आले आहे. मोदी सगळ्यांना देऊ, अशी घोषणा करतात आणि काहीतरी अटी घालून गोंधळात टाकतात. अद्याप गुजरात, महाराष्ट्रातील 15 हजार लोकांना जमिनी मिळालेल्या नाहीत. आज या गावांत पाणी भरले, तर लोकांचा मोठा आक्रोश होईल. त्यामुळे सरकारने तंत्रज्ञान आणि सर्वच गोष्टींचा फेरविचार करावा, अशी मागणी पाटकर यांनी केली.

Related posts: