|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » करते थोडी स्वप्ने गोळा, स्वप्नांचे वय कायम सोळा!

करते थोडी स्वप्ने गोळा, स्वप्नांचे वय कायम सोळा! 

महाराष्ट्रातील गझलकारांचा कणकवलीतील मुशायरा यादगार

प्रतिनिधी / कणकवली :

‘करते थोडी स्वप्ने गोळा, स्वप्नांचे वय कायम सोळा’ सिंधुदुर्गच्या गझलकार सौ. माधुरी चव्हाण-जोशी यांच्या अशा अप्रतिम गझलच्या ओळी सादर झाल्या आणि उत्स्फूर्तपणे दाद देणाऱया उपस्थित गझल रसिकांनी त्यानंतर सादर झालेल्या प्रत्येक  गझलेला टाळय़ांचाच प्रतिसाद दिला. निमित्त होते, ते शहरातील नगरवाचनालयात महाराष्ट्रातील विविध भागातील गझलकारांच्या सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या मराठी गझल मुशायऱयाचे!

मुंबई ब्रह्मकमळ साहित्य समूहाद्वारे सादर करण्यात आलेल्या व विशाखा डावखर (डोंबिवली) आणि नरेंद्र गिरीधर (नागपूर) यांनी अर्थवाही-भाववाही निरुपण केलेल्या या कार्यक्रमात सौ. जोशी यांच्याबरोबरच अमरावती येथील एजाज शेख, डोंबिवली येथील आनंद पेंढारकर, हेमंत राजाराम, गोवा येथील दत्तप्रसाद जोग, पुणे येथील विजय वडवेराव, वाशी येथील विशाल राजगुरू आदींनी आजच्या समाज वास्तवावर प्रकाश टाकणाऱया एकापेक्षा एक सरस गझल सादर करून उपस्थित रसिकांना निर्मळ आनंदाची भेट दिली.

पायऱया चढणार नाही, मंदिराच्या यापुढे

देवाच्या मागे लागून माणूस आपल्यातील सत्वच विसरून जातो. तो आपल्यातील परिश्रमाला किंमत देत नाही. माणूस आपले जगणेच देवावर सोडून देतो. अशावेळी त्याला स्वतःच्या वाटा सापडत नाहीत. माधुरी चव्हाण यांनी समाजातील याच विसंगतीवर आपल्या पुढील गझलमधून नेमका प्रहार केला आणि देवभोळय़ा माणसांना अंत:र्मुख व्हायला लावले. ‘पायऱया चढणार नाही, मंदिराच्या यापुढे, मी शोधेन वाटा या पुढे’ असे म्हणत, त्यांनी आपली गझलची पुढील वाटचाल यशस्वीच असल्याची ग्वाही दिली.

जो मला भेटतो, तेव्हा माझी ईद होते

आपला देश सर्वधर्मसमभाव बाळगणारा आहे. पण धर्मांचे मार्तंड मात्र धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचेच काम करतात. त्यांना फक्त शांत असणाऱया समाजात दुफळी माजवायची असते. याच पार्श्वभूमीवर एजाज शेख यांनी आपल्या गझलांमधून एकात्मतेचाच संदेश दिला आणि कोणत्याही काळात माणूसच श्रेष्ठ, असे सूचित केले, ते आपल्या ‘हिंदू-मुस्लीम-शीख-इसाई, जो मला भेटतो, तेव्हा माझी ईद होते’ या अप्रतिमपणे सादर केलेल्या गझलमधून. त्यांनी यावेळी काही गझला गाऊनही सादर केल्या.

दगडास देव बनवले, कमाल झाले

हेमंत राजाराम यांच्या गझलांही समाज वास्तवावर प्रहार करणाऱयाच होत्या. त्यांनीही आपल्या धीरगंभीर आवाजात गझला सादर केल्या. दगडाला देव मानणाऱयांच्या मनस्थितीचा वेध त्यांनी आपल्या गझलांमधून घेतला. समाज अजूनही अंधश्रद्धेच्या किती आहारी गेलाय, याचीच प्रचिती घडवली, ती ‘पत्थरास फोडून काढले कमाल झाले, दगडास देव बनवले, कमाल झाले’ या आपल्या गझलमधून. शेवटी त्यांनी ‘पाखरांच्या मुठी, किडे मुंग्या, धान्य नाही उरलेले’ अशा ओळी सादर करून गरिबांच्या परिस्थितीचेच उपस्थितांना भान आणून दिले.

मला शोधता का जातीत माझ्या

विजय वडवेराव हे गायक आणि गझल लेखकही. ते स्वतः गझल मैफिल सादर करतात. त्यांनी या मुशायऱयांत आपल्या अनेक गझला गाऊन सादर केल्या. ‘कुणी न दडले हृदयात माझ्या, अखेर फुले का वरातीत माझ्या’ या त्यांच्या गझलला  दाद तर मिळालीच परंतु ‘अरे लेखणी ही खरी जात माझी, मला शोधता का जातीत माझ्या’ अशी गझल सादर करून त्यांनी जाती जातीत समाज शोधणाऱयांचा चांगलाच समाचार घेतला आणि जातीतला माणूस श्रेष्ठ नाही, तर माणसातली माणुसकीच श्रेष्ठ असल्याची प्रचिती दिली.

विकला जातो पण धंद्याला बरकत नाही

आनंद पेंढारकर हे मूळचे सावंतवाडीचे. त्यांनी या मैफिलीत आपल्या गझला गाऊन सादर केल्या. जगण्याच्या निराशेचे चिंतन मांडताना त्यांनी रोजच्या रोज आपल्याला विकावेच लागते पण तरीही यश येत नाही, असे निरीक्षण आपल्या गझलांमधून नोंदविले ते, ‘रोज स्वतःला मांडून बसतो खिडकीमध्ये, विकला जातो पण धंद्याला बरकत नाही’ अशा गझलमधून. तर ‘निमित्त हे की शेजार नालायक मिळाला आहे, हा देश आतून की खिळखिळा झाला आहे,’ असे आजचे देशाचे चित्रच दत्तप्रसाद जोग यांनी आपल्या गझलेतून मांडले. विशाल राजगुरू यांनी तर ‘दगडामधूनी एक रोपटे उगवत आहे, आयुष्याला कसे जगावे सांगत आहे’ अशी प्रतिभासंपन्न गझल सादर करून माणसाने जिद्दीने कसे जगावे, याचेच प्रत्यंतर दिले.

हरकत नाही

महाराष्ट्रातील आजच्या तरुण गझलकारांच्या सहभाने गझल मुशायरा संपन्न झाला. या मुशायरेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांची ‘हरकत नाही’ ही गझल विशाखा डावखर यांनी प्रभाविपणे सादर करून गझल मुशायऱयाचा समारोप केला.

Related posts: