|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एक अनुभव एकदाच येतो

एक अनुभव एकदाच येतो 

ब्रायडल मेकअपमध्ये सुंदर दिसलेल्या वधूचे रोजच्या व्यवहारातले रूप, सुंदर मुखपृ÷ असलेल्या पुस्तकातला मजकूर, भन्नाट जाहीरनामा असलेल्या पक्षाची प्रत्यक्ष कामगिरी, अतिशय आवडलेल्या हिंदी गाण्याचे सिनेमातले चित्रीकरण, खूप छान लिहिणाऱया लेखकाच्या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव हे सगळे नेहमी अपेक्षाभंग का करतात हे कळायला मार्ग नाही. हॉटेल्सच्या बाबतीत तर हे नेहमीच होते.

एकदा मित्राबरोबर फिरत असताना पाऊस लागला म्हणून एका हॉटेलात शिरलो. हॉटेलची पाटी एखाद्या कवितासंग्रहाच्या कलात्मक मुखपृ÷ासारखी देखणी होती. आम्ही आत शिरलो. आत देखील कलात्मक सजावट. सुबक टेबल्स आणि त्यासमोर चार-चार खुर्च्या. भिंतींवर सर्वत्र विविध पदार्थांचे रंगीत फोटो. कोणताही फोटो पाहिला तरी तोंडाला पाणी सुटावं.

एवढं सगळं सुंदर असल्यावर पदार्थ नक्की बेचव असणार असं वाटून गेलं. भीत भीत दोन पदार्थ मागवले. पाचेक मिनिटात ते आले. पहिला घास घेतला आणि उत्स्फूर्तपणे मनात वाहवा उमटली. टीव्हीवर पाहुण्या आलेल्या गृहिणी वेगवेगळे पदार्थ बनवतात. मग सूत्रसंचालक एक घास खातो, डोळे मिटून आवंढा गिळतो आणि म्हणतो, वॉव… तसं झालं नाही. आमच्या मनात मनापासून वाहवा उमटली. आम्ही ते पदार्थ मिटक्मया मारीत संपवले आणि इतर पदार्थ मागवले. एकाही पदार्थाने निराशा केली नाही. बिल देऊन बाहेर पडलो तेव्हा आम्ही अगदी तृप्त होतो.  

घरी आल्यावर हे बायकोला सांगितलं. लोकप्रिय कलाकृतीवर अभिप्राय देताना समीक्षक लोक जसा चेहरा करतात तसा तिने चेहरा केला.

पण विक्रमाने जसा हट्ट सोडला नाही तसा मीही हट्ट सोडला नाही. खूप दिवस तिला आग्रह केला आणि शेवटी ती माझ्या बरोबर यायला तयार झाली. एके सकाळी आम्ही त्या उपाहारगृहात गेलो. का कोण जाणे, आज पूर्वीची रया नव्हती. वेटरचा शर्ट मळका आणि चेहरा भकास होता. आम्ही मागवलेले पदार्थ तयार नव्हते. जे समोर आले ते धड नव्हते. घरी आलो तेव्हा बायकोच्या विजयी मुदेशी मला नजर मिळवता येईना.  

कुठेतरी वाचलेले बोधामृत आठवले. त्याच नदीवर त्याच ठिकाणी दुसऱयांदा जाऊन तुम्ही पाण्यात उतरता तेव्हा ते पाणी, त्या पाण्याची अनुभूती पूर्वीपेक्षा वेगळीच असते. आता मी एक निश्चय केला आहे. मला एखाद्या हॉटेलमधला पदार्थ, एखादे गाणे, सिनेमा, पुस्तक आवडले तरी इतरांना तो अनुभव घेण्याचा आग्रह करायचा नाही.

Related posts: