|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » केएमटी अपघाग्रस्तांना मदत तत्काळ द्यावी

केएमटी अपघाग्रस्तांना मदत तत्काळ द्यावी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावर रविवारी (दि.1) झालेल्या केएमटी अपघातातील जखमी सर्व व्यक्ती व मृतांच्या वारसांना महापौरांनी जाहीर केलेली रक्कम तत्काळ द्यावी, अशी मागणी महापौर हसिना फरास यांच्याकडे शनिवारी नगरसेवक संदीप कवाळे यांनी निवेदनाव्दारे केली आहे. 

या निवेदनात म्हटले आहे, पंजे विसर्जनावेळी केएमटी बसच्या अपघातात तीन ठार तर 18 जण जखमी झाले. या अपघाताची गंभीर दखल घेत महापौर हसिना फरास यांनी मृतांच्या वारसांना पाच लाख तर सर्व जखमींना एक लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. अपघातातील मृतांमध्ये तानाजी भाऊ साठे (वय 50), आनंदा बापू राऊत (वय 55) सुजल भानुदास अवघडे (वय 15) यांचा तर 18 जखमींचा समावेश आहे. केएमटीच्या निष्क्रीय व बेजबाबदारपणाचे हे बळी असून प्रशासनाने ही घटना गंभीर घेऊन पुन्हा अशा घटणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. या निवेदनातील मागण्यांमध्ये चालकासह सर्व संबंधीत अधिकाऱयांवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करून तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, जाहीर झालेल्या रक्कमेचे धनादेश तत्काळ संबंधीतांच्या खात्यावर जमा करावेत, मृत किंवा जखमींच्या कुटूंबातील एका सदस्याला मनपाने सेवेत समावून घ्यावे, नेमण्यात आलेली चौकशी समिती रद्द करून सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पारदर्शीपणे काम करणारी स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करावी, आयुष्यमान संपलेल्या केएमटी बस तत्काळ स्प्रॅप कराव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या दहा दिवसात मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

तसेच महापौरांनी सोमवार (दि.9) रोजी होणाऱया सर्वसाधारण सभेत केएमटी अपघात प्रश्नी विशेष चर्चा घडवून आणावी. शुक्रवार (दि.13) रोजी अपघातातील मृतांचे उत्तरकार्य होणार आहे. यापूर्वी जाहीर मदतीचा निधी मिळावा, अशी मागणी नगरसेवक संदीप कवाळे यांनी महापौरांकडे केली. यावेळी नगरसेवक संदीप कवाळे, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, एन.बी.कवाळे, सिताराम कवाळे, सुरेश कवाळे, आनंदा शिंदे, ऍड. दत्ताजी कवाळे, ऍड.रणजित कवाळे, ऍड.सचिन आवळे आदी उपस्थित होते.