|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » गोव्यात आज इराक-माली आमनेसामने

गोव्यात आज इराक-माली आमनेसामने 

प्रतिनिधी / मडगाव

मागील हंगामात उपजेतेपद संपादन करणारा मालीचा संघ येथे इराकविरुद्ध वर्चस्व गाजवण्याच्या मजबूत इराद्यासह मैदानात उतरेल. रात्री 8 वाजता या लढतीला सुरुवात होईल. माली आजवर या स्पर्धेत दोनवेळा विजेते ठरले असून यंदा साखळी फेरीअखेर ब गटात त्यांनी दुसरे स्थान संपादन केले होते. प्रारंभी, गटजेत्या पराग्वेविरुद्ध त्यांना 2-3 अशी निसटती हार जरुर स्वीकारावी लागली. पण, नंतर तुर्कीचा 3-0 तर न्यूझीलंडचा 3-1 असा पराभव करत त्यांनी पूर्ण 6 गुण वसूल केले.

आफ्रिकन खंडातील माली खेळाडूंची धिप्पाड शरीरयष्टी व त्यांचा आक्रमक खेळ कसा थोपवावा, याची उकल येथे इराकला सर्वप्रथम करावी लागेल. स्टार खेळाडू व कर्णधार मोहम्मद दाऊदच्या गैरहजेरीत इराकचा संघ मालीविरुद्ध किती संघर्ष करेल, हे देखील पाहावे लागेल. लस्साना व ट्रओरे या माली स्ट्रायकर्सनी आतापर्यंत समन्वयाचा योग्य मिलाफ साधत प्रतिस्पर्ध्यांची बचावफळी खिळखिळी करण्यात फारशी कसर सोडलेली नाही. अर्थात, कमजोर बचावफळी ही माली संघाची स्वतःची चिंतेची बाब आहे. पराग्वेने त्यांच्या बचावातील त्रुटी चव्हाटय़ावर आणल्या होत्या.

इराकने यंदा फ गटातून इंग्लंडपाठोपाठ दुसरे स्थान संपादन केले. मेक्सिकोविरुद्ध पहिली लढत 1-1 अशी बरोबरीत राहिल्यानंतर त्यांनी चिलीचा 3-0 असा धुव्वा उडवला. पण, नंतर इंग्लंडविरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यात त्यांना 0-4 अशा फरकाने हार स्वीकारावी लागली होती. त्याच लढतीत 62 व्या मिनिटाला कर्णधार मोहम्मद दाऊदला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने तो पुढील सामन्यातून बाहेर फेकला गेला आणि हा त्यांच्यासाठी खरा मोठा धक्का ठरला होता. दाऊद हा त्यांच्या संघासाठी प्रेरणास्थान ठरत आला असून त्याने स्वतः 3 गोल देखील केले आहेत. त्याची गैरहजेरी इराकला या सामन्यात बऱयाच प्रमाणात जाणवू शकते. इराकने या स्पर्धेच्या बाद फेरीत खेळण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे.