|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राजाराम चव्हाणांचे खूनी गजाआड

राजाराम चव्हाणांचे खूनी गजाआड 

पोलिसांनी लावला 48 तासात खूनाचा छडा

प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतानाही केला हायटेक तपास

प्रतिनिधी /मंडणगड

वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम चव्हाण यांच्या तीन मारेकऱयांच्या मुसक्या अवघया 48 तासांच्या आत आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षदर्शी पुराव्यांचा अभाव असताना तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

31 नोव्हेंबर 2017 रोजी उन्हवरे तोंडली मार्गावर वडाप व्यावसायिक राजाराम चव्हाण यांचा खून झाला होता. दिवसाढवळ्या झालेल्या खुनामुळे मंडणगडसह दापोली तालुकाही हादरुन गेला असताना पोलिसांनी केलेल्या यशस्वी हायटेक तपासाचे विशेष कौतुक होत आहे. ताब्यात घेण्यात आलेले तिन्ही आरोपी हे दापोली तालुक्यातील असून या तिघांनीही एकत्रितपणे गुह्याची कबुली दिली आहे. अभिजीत सुधाकर जाधव (22, गवे), नरेंद्र संतोष साळवी (20, बोंडीवली खोतवाडी), अक्षय विष्णू शिगवण (20) या तीन आरोपींना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. पैशाची आवश्यकता असल्याने खून करुन चोरी केल्याची कबुली आरोपीनी दिली आहे. गुह्याचे तपासकाम सुरु असल्याने खुनासाठी केवळ चोरी हे एकमेव कारण होते का? की अन्य कोणत्या कारणांसाठी तिघांनी राजाराम चव्हाण यांचा खून केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत. खूनासाठी वापरण्यात आलेले हत्यार शोधण्याचे, याचबरोबर चोरी केलेला मुद्देमाल व फिर्यादीकडून खुन्यांची ओळख पटवण्याचे प्रक्रिया अद्याप बाकी आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले तीनही तरुण पंचविशीच्या आतील आहेत. यातील अभिजीत हा वेल्डांगचे काम करतो, तर नरेंद्र हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, अक्षय सध्या बेरोजगार असल्याची माहिती पुढे आली आहे. या तिघांनी पैशांची आवश्यकता असल्याने चोरीचा कट रचला. राजाराम चव्हाण यांच्याशी ओळख नसतानाही त्यांच्यावर पाळत ठेऊन गाडी भाडय़ासाठी हवी असल्याचे खोटे कारण सांगून वेरळ येथून उन्हवरे मार्गावर नेले. चोरीचा कट पूर्ण करताना झालेल्या झटापटीत चव्हाण हे जखमी झाले व जखमी अवस्थेत ते पळाले. त्यांना जिवंत सोडल्यास पालिसांना सर्व सांगून आपल्याला अडचणीत आणेल या भीतीने तिंघानीही त्यांचा पाठलाग करुन गाठले व त्यांच्या शरिरावर विविधठिकाणी वार करुन ठार केले. त्यानंतर उन्हवरे-तोंडली मार्गावर पुलाच्या मोरीखाली त्यांचा मृतदेह टाकून घटनास्थळावरुन पलायन केले होते.

पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाल्यावर कुठलाही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना खुन्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. खुन्यांनी चव्हाण यांचे दोन्ही मोबाईल लांबवले असल्याने केवळ कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून खुन्यांपर्यंत पोहचणे अवघड होते. हे अवघड आव्हान लिलया पेलत पोलिसांनी तांत्रिक तपासाचे आव्हानही स्वीकारले व 48 तासात खुन्यांना गजाआड केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, चिपळूण उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, स्थानके गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सासणे, मंडणगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संभाजी यादव, दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तालुक्यांत राबवलेल्या शोध अभियानात तीन पोलीस पथकांनी भाग घेतला. पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस दलाचे मंडणगड व दापोली तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Related posts: