|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘सरसेनापती संताजी’ ची पहिली उचल प्रतिटन विनाकपात 3000 रुपये

‘सरसेनापती संताजी’ ची पहिली उचल प्रतिटन विनाकपात 3000 रुपये 

अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची माहिती – एफआरपी 2601 रु. असताना 3000 रुपये पहिली उचल

प्रतिनिधी/ सेनापती कापशी

काळम्मा बेलेवाडी ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर  कारखान्याच्या संचालक मंडळाने सन 2017-18 या चालू गळीत हंगामामध्ये   गळीतास येणाऱया ऊसासाठी विनाकपात प्रतिटन 3000 रुपये पहिली उचल जाहीर  केली आहे. अशी माहिती कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली. या साखर कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम वगळता हा तिसरा हंगाम असून प्रस्थापित साखर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर आणि यंदाची पहिली उचल दिल्याने शेतकऱयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अधिक माहिती देताना अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, मागील हंगामामध्ये पाऊस व पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जिह्याच्या इतिहासात कमी ऊसाचे उत्पादन झाले. साखर उताऱयावरही परिणाम झाला. अशा कठीण परिस्थितीत आपल्या साखर कारखान्याचा चाचणी हंगाम वगळता हा तिसरा गळीत हंगाम आहे. स्वतःच्या हक्काचे ऊसक्षेत्र निर्माण करण्याचे काम सुरु असून त्यास दोन ते तीन वर्षाचा अवधी जावा लागणार आहे. त्यामुळे ऊस फार लांबून आणावा लागतो. सहाजिकच वाहतूक खर्च वाढतो. कारखान्याची यावर्षी एफआरपी 2601 रुपये इतकी असून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तोडग्यानुसार अधिक 100 रुपये म्हणजेच 2701 रुपये इतकी पहिली उचल झाली असती. परंतु तालुक्यातील इतर साखर कारखान्यांच्या उचलीबरोबर आपली उचल असली पाहिजे, असे सांगून नविद               मुश्रीफ म्हणाले, कारखाना नवीन असला, व्याज व कर्जाचे हप्ते जरी असले तरी ऊस उत्पादकांच्यामध्ये विश्वास अधिक दृढ करणे महत्वाचे आहे. चालू हंगामात विनाकपात प्रतिटन 3000 रुपये पहिली उचल देण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला.

तसेच सभासदांना महिना पाच किलो सवलतीच्या दरामध्ये साखर, गळीतास येणाऱया प्रतिटन अर्धा किलो टनेज साखर, कंपोस्ट खत, मळी व काळी पांढरी राख इत्यादी शेतकऱयांच्या बांधावर पोहोच केली जाते. याशिवाय ऊस विकासाच्या ठिबक सिंचन, बि-बियाणे, बेसल डोस या सर्व योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. तरी सर्व ऊस उत्पादकांना विनंती करणेत येते की, आपला उत्पादीत केलेला सर्व ऊस आपल्या कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे.

शासनाने ऊस वजन काटे तपासणी करण्यासाठी भरारी पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. यामध्ये सर्व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, ऊस उत्पादक शेतकऱयांचे प्रतिनिधी, तोडणी व वाहतुकदारांचे प्रतिनिधी असावेत. तसेच सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करावेत, स्कॉडसारखा              प्रयोगदेखील करण्यात यावा. कारखान्यांच्या स्पर्धेमुळे ही बाब आवश्यक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूकदारांचे समाधान होईल, असेही अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी जनरल मॅनेजर महेश जोशी, मुख्य शेती अधिकारी प्रताप मोरबाळे, तोडणी वाहतूक मॅनेजर एम. एस. इनामदार, लेबर ऑफिसर संतोष मस्ती, आयटी मॅनेजर संतोष वाळके यांच्यासह सर्व खातेप्रमुख व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.