|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » दबावपूर्ण वातावरणातून सावरण्यास बाजाराला यश

दबावपूर्ण वातावरणातून सावरण्यास बाजाराला यश 

मुंबई / वृत्तसंस्था :

गुरूवारी भांडवली बाजारात दबाव दिसून आले. तरीही 10,300 अंकांच्या स्तरावर स्थिरावण्यास निफ्टीला यश आले. टाटा मोटर्ससहीत काही वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे आलेले उत्तम निकाल आणि जीएसटी समितीच्या आगामी बैठकीसंबंधी सकारात्मक वातावरणामुळे बाजार सावरला. मिडकॅप समभागांची जोरात खरेदी झाली. त्यामुळे हा निर्देशांक 1.25 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

बीएसईचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 32 अंक (0.10 टक्क्यांच्या) वधारासह 33,250.93 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय भांडवली बाजाराचा निर्देशांक निफ्टी 5.8 अंक (0.06 टक्के) वधारत 10,310 अंकांवर स्थिरावला.

दिग्गज समभागांमध्ये मंदीचे वातावरण असताना मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वधारत 17630 अंकांवर बंद झाला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्यांच्या बळकटीसह 16878 अंकांनजीक बंद झाला. कंज्पंशन समभांगामध्येही तेजी दिसून आली.

वाहन, एफएमसीजी, औषधनिर्मिती आणि स्थावर समभागांची विक्री झाल्याने बाजारात दबाव दिसून आले. बीएसईच्या तेल व नैसर्गिक वायू निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.62 टक्के, औषधनिर्मिती निर्देशांक 0.62 टक्के तर रियल्टी निर्देशांकांमध्ये 0.10 टक्क्यांची घसरण झाली. मात्र बँक निफ्टी 0.42 टक्क्यांच्या उसळीसह 25,290च्या स्तरावर बंद झाला, धातू, माहिती-तंत्रज्ञान आणि सार्वजनिक बँक समभागांमध्ये खरेदी दिसून आली. निफ्टीचा धातू निर्देशांक 0.46 टक्क्यांनी वधारला. तर निफ्टीच्याच सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँक निर्देशांक अनुक्रमे 1.55 टक्के व 0.33 टक्क्यांची बळकटीस बंद झाले.

दिग्गज समभागांची कामगिरी

भेल, एशियन पेन्ट्स, आयसीआयसीआय, भारती एअरटेल, टाटा स्टील, रिलायन्स, एचयूएल हे समभाग 1.33 ते 2.22 टक्क्यांनी वधारले. तर आयटीसी, कोल इंडिया, ओएनजीसी, ल्युपिन, एचडीएफसी, सिप्ला हे समभाग 2 ते 1.21 टक्क्यांनी घसरले. रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स कम्युनिकेशन, व्हिडिओकॉन इंडस, ग्लेनमार्क फार्मा, अशोक लेलॅन्ड, ओरिएन्टल, बँक हे मिडकॅप समभाग 15.16 ते 7.64 टक्क्यांनी घसरले.