|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीवाडीमध्ये डेंग्यू, चिकुनगुनियाचे अनेक रूग्ण

सांगलीवाडीमध्ये डेंग्यू, चिकुनगुनियाचे अनेक रूग्ण 

 

प्रतिनिधी/ सांगली

महापालिका क्षेत्रात असलेल्या सांगलीवाडी परिसरामध्ये चिकुनगुनिया आणि डेंग्यूची साथ आली असून हजारावर रूग्ण विविध रूग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. या साथीने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षांमुळे साथ आली असून तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात अन्यथा महापालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी दिला आहे.

महापालिका क्षेत्रामध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया आणि गॅस्ट्रोची साथ आहे. दुषित पाणी आणि डास वाढल्याने साथ फैलावत आहे. महापालिका क्षेत्रातील विस्तारीत भागात या साथीने अनेक रूग्ण त्रस्त आहेत. विशेष करून संजयनगर, शामरावनगर, यासह गुंठेवारी भागात साथीच्या आजाराचे अनेक रूग्ण आहेत.

गेल्या काही दिवसापासून शहरालगत असलेल्या सांगलीवाडीमध्ये तर या साथीने थैमान घातले आहे. सध्या हजारावर रूग्ण शासकीय तसेच विविध खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. सांधेदुखी, तापाच्या रूग्णांची संख्या अधिक आहे. अनेकांच्या पेशी कमी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही साथ आली असल्याचा आरोप माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी केला आहे. भागात स्वच्छता केली जात नाही. दुषित पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सध्या सांगलीवाडीत चिकुनगुनिया, गॅस्ट्रो आणि डेंग्युची साथ आहे. प्रशासन आणि आरोग्य विभाग सुस्त झाला असून माणसं मेल्यावर उपाययोजना करणार काय असा सवाल करून पाटील म्हणाले, तात्काळ उपाययोजना करून साथ आटोक्यात आणावी अन्यथा महापालिकेवर मोर्चा आणून टाळे ठोकण्यात येईल.

             महापालिकेच्या वतीने आवाहन

 दरम्यान साथीच्या आजाराबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, साथीच्या आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ दवाखान्यामध्ये जावून उपचार करावेत. साथ अटोक्यात आणण्यासाठी वैदयकीय अधिकारी, स्टाफ, तसेच आशा वर्कर्स मार्फत तसेच नर्सीग, विदयार्थ्यांमार्फत उपचार मोहिम राबविण्यात येत आहे. कीटकजन्य आजाराबाबत घरोघरी जावून माहिती देणे तसेच आरोग्य शिक्षण देणे, किटकजन्य आजाराबाबत हस्तपत्रिका वाटप करण्यात येत आहेत. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी किटकजन्य रोगाचा फैलाव होवू नये याकरिता प्रतिबंध करण्यासाठी प्रभावीपणे उपायोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी सतर्क रहावे, असेही आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Related posts: