|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणातील तरूणाचा तापाने मृत्यू !

चिपळुणातील तरूणाचा तापाने मृत्यू ! 

वार्ताहर /अडरे :

चिपळूण तालुक्यातील गाणे येथील कबड्डीपट्टू विजय गजमल यांचे बंधू रितेश जयवंत गजमल (29) याचा तापाने मृत्यू झाला. रितेशचा मृत्यू डेंग्यू अथवा लॅप्टोस्पायरोसीसने झाला असल्याचा संशय व्यक्त होत असून गाणे गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या रक्त चाचण्या निगेटीव्ह असल्या तरी अधिक तपासणीसाठी रक्तनमुने मुंबईतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

रितेशला गेल्या तीन दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे प्रारंभी त्याला शहरातील लाईफ केअर रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला बुधवारी डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र रात्रीच उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. दरम्यान त्याचा मृत्यू डेंग्यू किंवा लॅप्टोने झाल्याचा संशय व्यक्त होत आहे, मात्र आरोग्य विभागाने तो फेटाळून लावला आहे. रितेशचे सर्व अहवाल निगेटीव्ह असून फुफ्फुसाच्या आजाराने मृत्यू झाल्याचे रूग्णालयाच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

प्राथमिक चाचण्यांचे अहवाल उपलब्ध झाले असले तरी रितेशचे रक्त नमुने अधिक तपासणीसाठी मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर बुधवारी गावात तापाचे रूग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली. मात्र तापाचा एकही रूग्ण आढळून आला नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.

गुरूवारी रितेशवर गाणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. रितेशच्या अकाली निधनाने गाणे गावावर शोककळा पसरली आहे.

परिक्षणसाठी कोकणात पुरेशी यंत्रणाच नाही!

डेंग्यू शहरातून गावाकडे येत असला तरी त्यापेक्षा लेप्टोस्पायरोसीसचे जंतू भयानक फैलावत आहेत. मात्र या आजाराचे परीक्षण करण्यासाठी पुरेशी यंत्रणा कोकणात नाही. रुग्णालयात रुग्णाला दाखल केल्यावर औषधोपचार सुरू केल्यानंतर या आजाराचे परीक्षण (विषाणू) होणे जिकिरीचे होते. ते तपासण्यासाठी रक्त नमुने पुणे व मुंबई शहरात पाठवावे लागते. या सर्वामध्ये वेळ जात असल्याने वेळेत निदान होत नाही. त्यामुळे तपासण्यासाठी लागणाऱया प्रशासकीय परवानग्या रुग्णालयास मिळाल्यास कोकणातील डेंगू व लेप्टोस्पायरोसीसने वाढत चाललेल्या मृत्यूचे प्रमाण रोखता येऊ शकणार आहे. शिवाय त्यावर नियंत्रणही मिळवता येणार असल्याच्या प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहेत.

Related posts: