|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वर्षभरात 3.11 कोटीचा ड्रग्ज जप्त

वर्षभरात 3.11 कोटीचा ड्रग्ज जप्त 

राज्यभरात 157 तक्रारी नोंद, 171 संशयितांना अटक

प्रतिनिधी/ पणजी

गोवा पोलीस खात्याने जानेवारी 2017 ते आतापर्यंत राज्यभरात विविध ठिकाणी केलेल्या अमली पदार्थ विरोधी कारवाईत 3 कोटी 11 लाख 65 हजार 400 रुपये किमंतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थामध्ये चरस, एलएसडी, गांजा व एमडीएमएचा समावेश आहे. या प्रकरणात एकूण 157 तक्रारी नोंद केल्या असून 171 संशयितांना अटक केली आहे. त्यात 138 भरतीय तर 33 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

गेल्या तीन वर्षांच्या तुलने 2017 साली मोठय़ा संख्येने ड्रग्ज विक्रेते तसेच ड्रग्जचे सेवन करणाऱयांना अटक करण्यात आली आहे. 2014 साली 58 संशयितांना अटक केली होती, 2015 साली 71 संशयितांना अटक करण्यात आली होती. 2016 साली 69 संशयितांना अटक केली आहे तर 2017 साली 171 संशयितांना अटक केली आहे. 

पर्यटकांच्या दृष्टिकोनातून डिसेंबर महिना हा गोव्यात फार महत्वाचा मानला जातो. पर्यटक हंगाम बहरत आहे. देश विदेशातील पर्यटक ख्रिसमस व नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठय़ासंखेने गोव्यात येत असतात. ठिकठिकाणी नाईट पाटर्य़ांचे आयोजन केले जाते. या पाटर्य़ांमधून मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज व्यवसाय होत असतो. यावर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वागातोर येथे होणाऱया इडीएम फेस्टिवलला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी मोठय़ाप्रमाणात पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. ड्रग्ज विरोधात पोलिसांनी कडक धोरण अवलंबले आहे. पाटर्य़ामधून किंवा इडीएममध्ये ड्रग्जचा व्यावहार होऊ नये यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत.

डिसेंबरच्या 26 दिवसांतच दीड कोटीचा ड्रग्ज जप्त

1 डिसेंबर ते आतापर्यंत पेलिसांनी अमली पदार्था विरोधात केलेल्या कारवाईत एकूण 13 तक्रारी नोंद केले आहेत. एकूण 16 जणांना अटक केली आहे. यामध्ये 10 भरतीय तर 6 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. डिसेंबर महिन्याच्या अवघ्या 26 दिवसात 1 कोटी 51 लाख 4 हजार 500 रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. यात एलएसडी, गांजा, चरस, व एमडीएमएचा समावेश आहे.

राज्यातील ड्रग्ज पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलीस जोमाने काम करीत आहेत. डिसेंबर महिन्यात पाटर्य़ांतून ड्रग्जचा वापर होत असल्याची जाणीव पोलिसांना आहे. त्यामुळे किनारी भागात मोठय़ाप्रणात पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. इडिएम पार्टीवर पोलिसांचे खास लक्ष असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत 144 तक्रारींची नोंद

गोवा पोलिस खात्याने जानेवारी ते नोव्हेंबर अखेरपर्यंत 144 तक्रारी नोंद केल्या आहेत. एकूण 1 कोटी 60 लाख 60 हजार 900 रुपये किमंतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे. यात 155 संशयितांना अटक केली आहे. या संशयितामध्ये 128 भारतीय तर 27 विदेशांचा समावेश आहे, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी विभागाचे अधीक्षक उमेश गावकर यांनी दिली आहे.

29 तक्रारीत 1 कोटी 34.15 लाखाचा ड्रग्ज जप्त : एएनसीची कारवाई

एकूण 157 तक्रारीपैकी 29 तक्रारी या अमली पदार्थ विरोधी विभागाने नोंद केल्या आहेत. त्यात 1 कोटी 34 लाख 41 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे. त्यात 35 संशयितांना अटक केली आहे. त्यात 26 भारतीय तर 9 विदेशी नागरीकांचा समावेश आहे. विदेशी संशयितामध्ये नायजेरियन, कोरीयन  ब्रिटन, जर्मन, इस्त्रायली यांचा समावेश आहे.

क्रॅक डाऊन ड्रग्ज मोहिमेत 100 जणांना अटक

राज्यातील ड्रग्ज व्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलीस खात्याने क्रॅक डाऊन ड्रग्ज अशी मोहिम राबविली होती. मोहिमेच्या काळातील केवळ साडेतीन महिन्यात म्हणजे 13 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 56 लाख 54 हजार 100 रुपयांचा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला तर तब्बल 100 संशयितांना अटक करण्यात आली होती. यात 42 गोमंतकीय, 44 इतर राज्यातील तर 14 विदेशी नागरिकंचा समावेश आहे.

राज्यातील ड्रग्ज पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहेत. गोवा पोलीस, त्यांच्या सोबत एएनसी विभाग, एनसीबी, कस्टम, अबकारी खाते तैनात असून ड्रग्ज नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.