|Friday, February 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कान्हा दूध मागे

कान्हा दूध मागे 

श्रीकृष्ण तर भगवान नारायणाचे अवतार आहेत. ते विष पचवू शकत नव्हते काय? हे काही पटत नाही. कारण भगवान नारायण तर काळाचेही काळ आहेत. कृष्णाचे डोळे मिटून घेण्याचे कारण निराळेच आहे. त्यांच्या डोळय़ांत सूर्य आणि चंद्राचा वास आहे. महायोगी सूर्यमंडळाला पार करून ब्रह्मलोकांत जात असतात. कृष्ण पूतनेला ब्रह्मलोकांत पाठविणार आहेत हे पाहून सूर्य चंद्रांना, अर्थात भगवंताच्या नेत्रांना बरे वाटले नाही. आपल्या कृष्णाला तर ही विषपान करायला आली आहे. तर मग हिला ब्रह्मगति का दिली जावी असा विचार करून डोळय़ांनी पापण्या बंद करून घेतल्या. चांगले तर हेच की ईश्वराला उत्तमोत्तम वस्तू अर्पण करावी. आपणही पूजेमध्ये कोणत्या वस्तू देवाला अर्पण करतो? किडकी सुपारी आणि रुपयाचे नाणे देवासमोर ठेऊन काय काय मागतो? एकदा आपल्या मनांत डोकावून पहावे की पूतना कुठे दडून तर बसली नाही ना!

सूर्य चंद्र, दोन्ही डोळे विचार करू लागले की सर्वोत्तम वस्तु अर्पण करण्याऐवजी ही पूतना तर विष घेऊन आली आहे. हिला सद्गति मिळू नये हेच चांगले. असा विचार करून सूर्य चंद्ररूपी नेत्रांनी आपली प्रवेशद्वारे (म्हणजे पापण्या)  बंद करून घेतली.

दुसरे एक महात्मा निराळेच कारण सांगतात-भगवंत विचार करत होते की या विष देणाऱया पूतनेला मी मुक्ति देणार आहे तर दही, दूध, लोणी खाऊ घालणाऱया व्रजवासी गोपगोपिंना मी कोणती गति द्यावी? कारण मुक्तीपेक्षा कोणती श्रे÷ वस्तु द्यायला माझ्यापाशी नाही. याप्रमाणे विचारात मग्न झाल्याने भगवंतांनी डोळे मिटून घेतले.

याप्रमाणे चिंतन करत महात्मा लोक भगवंताच्या लीलेत रममाण होत असतात.

नामदेवराय पुढे वर्णन करतात-

विष भरूनि स्तन निघाली पूतना ।

तीतें देखुनी कान्हा दूध मागे ।।

येऊनि द्वारिं थोकली तंव यशोदा देखिली ।

कृष्णा आली माउली राहें उंगा ।।

तंव अधिकचि आळी करी वनमाळी ।

येरी म्हणे दे जवळी पाजीन दूध ।।

पूतने वोसंगा दिधलासे कान्हा ।

घटघट पय पाना करीतसे 

शोषियलें विश्व न धायची भूक ।

नामया स्वामी न राखे प्राण तिचा ।।

स्तनाला विष माखून पूतना आली आहे हे पाहून कान्हा आपल्या आईकडे दूध मागण्यासाठी रडू लागला. अतिशय सुंदर रूप धारण केलेली पूतना दाराशी येऊन थांबली आहे, हे यशोदेने पाहिले. तेव्हा ती कृष्णाला म्हणाली-कोणी स्त्री आलेली आहे, तू थोडावेळ उगी राहा. तेव्हा कान्हा अधिकच हट्ट करू लागला आणि जास्तच जोरात रडू लागला. तेव्हा पूतना यशोदेला म्हणाली-अगं! अशी कशी गं आई तू! या तान्हय़ा बाळाला भूक लागली आहे, हेही तुला कळत नाही. काही काळजी करू नकोस. त्याला दे माझ्याकडे. मी याला दूध पाजले तर हा चांगला धष्ट पुष्ट होईल.

  1. – ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: