|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लोकांनी केलेल्या उद्घाटनाचा राखला गेला मान

लोकांनी केलेल्या उद्घाटनाचा राखला गेला मान 

प्रतिनिधी/ मडगाव

कोलवा सर्कलचे जनमत कौल चौक असे नामकरण करण्यात आले असून अधिकृत सोहळय़ाच्या एक दिवस आधी नागरिकांच्या एका गटाने केलेल्या उद्घाटनाला मंगळवारी मान देण्यात आला. जनमत कौलावेळी गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहावे याकरिता झटलेल्या नायकांना हा चौक अर्पण करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन न करता केवळ चौकाच्या ठिकाणी छायाचित्र तेवढे घेण्यात आले. पर्रीकर, नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई व अन्य मान्यवरांसह जनमत कौलाच्या चळवळीत योगदान दिलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय यांचा त्यात सहभाग राहिला.

यावेळी उपसभापती मायकल लोबो, जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर, ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर, नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई, बाबूश मोन्सेरात, उपनगराध्यक्ष टिटो कार्दोज, नगरसेवक, उद्योगपती दत्तराज साळगावकर, प्रसाद लोलयेकर तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे ट्रॉजन व इतर उपस्थित होते.

मडगाव पालिकेने कोलवा सर्कलचे जनमत कौल चौक असे नामकरण करण्याचा ठराव घेतल्यानंतर त्या दिशेने तयारी सुरू करण्यात येऊन मंगळवारी त्याचे उद्घाटन निश्चित करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच सोमवारी नागरिकांच्या एका गटाने फेरी काढून सदर चौकाचे उद्घाटन केले होते. जनमत कौलाच्या चळवळीत सर्वसामान्यांनी दिलेल्या योगदानाचे प्रतीक म्हणून एका महिलेच्या हस्ते सदर उद्घाटन करण्यात आले होते.

हा सर्व गोमंतकीयांचा सोहळा : सरदेसाई

ज्या नागरिकांनी स्फूर्ती दाखवून एक दिवस अगोदर हे उद्घाटन केले त्यांचा आम्ही मान राखलेला आहे. हा सर्व गोमंतकीयांचा सोहळा आहे. त्यामुळे एक दिवस अगोदर उद्घाटन केले म्हणून काही वावगे झालेले नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी नगरनियोजनमंत्री सरदेसाई यांनी व्यक्त केली. गोवा फॉरवर्ड पक्षाने गोमंतकीयत्वाला लोकांच्या मनात आणि राज्याच्या कारभारात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. त्यानंतर जनमत कौल दिलाचे महत्त्व ठसविण्याचे काम केले आहे. जनमत कौलामुळे गोमंतकीयांची वेगळी ओळख अबाधित राहू शकली. सोमवारच्या नागरिकांच्या कृतीमुळे भारतातील त्या एकमेव जनमत कौलाविषयीचा लोकांचा उत्साह कमी झालेला नाही हे स्पष्ट झाले आहे. आम्हाला लोकांच्या कृतीमुळे खेद वाटलेला नाही, कारण ते सर्व गोमंतकीयच आहेत, असेही सरदेसाई यांनी पुढे सांगितले.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 38 तैलचित्रांचे अनावरण केले. यात जनमत कौलातून गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहावे याकरिता योगदान दिलेल्या डॉ. जॅक सिक्वेरा, पुरुषोत्तम काकोडकर, रवींद्र केळेकर, चंद्रकांत केणी, उल्हास बुयांव, शाबू देसाई, एनियो पिमेंता, डॉ. लुईस प्रोत बार्बोझ, शंकर भांडारी, श्रीपाद घार्से, व्हिक्टोरिया फर्नांडिस, निर्मला सावंत, वासुदेव सरमळकर, विजया सरमळकर, उदय भेंब्रे, इराज्म द सिक्वेरा, वासुदेव साळगावकर, उर्मिंदा लीमा लैतांव, डॉ. आल्वारो द लॉयोला फुर्तादो, डॉ. विनायक मयेकर, लक्ष्मणराव सरदेसाई, सी. पी. द कॉस्ता, सुहासिनी तेंडुलकर, तिओतोनियो पेरेरा, जनार्दन फळदेसाई, कार्मू रॉड्रिग्स, अनंत नरसिंह नायक उर्फ बाबू नायक, नरसिंह दामोदर नायक, एम. बॉयर, बाबुराव केरकर, शांताराम म्हांब्रे, डॉ. सॅबेस्त्यांव माझारेलो, जुआंव मारियान डिसोझा, ऑर्लांदो सिक्वेरा लोबो, ज्योकीम आरावजो व डॉ. मावरिलियो फुर्तादो यांचा समावेश आहे.

Related posts: