|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बचत गटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय

बचत गटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय 

प्रतिनिधी/ खंडाळा

मुलगा वंशाला दिवा पाहिजे यापेक्षा मुलगीच आपला वारसा समजुन तिला वाढवा, भविष्यात कर्तृत्ववान स्त्राr बनून केवळ कुटुंबाचा नाही तर समाजाचा, देशाचा आधार बनणार आहे. दरम्यान, माझ्या मायमाऊलींच्या बचत गटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी नायगाव येथे बोलताना केले.

 खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सातारा जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभागाच्यावतीने माझी कन्या भाग्यश्री योजना प्रचार प्रसार रथयात्रा समारोप आणि भाग्यश्री मेळावा आयोजित करण्यात आला. प्रारंभी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर व मान्यवरांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर सभास्थळी आगमन झाले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी जिल्हय़ाचे पालकमंत्री विजय शिवतारे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार मकरंद पाटील, आसंगिता ठोंबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती शिवाजीराव सर्वगोड, माजी उपाध्यक्ष नितिन भरगुडे- पाटील, सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदना धायगुडे, आश्विनी पवार, चंद्रकांत यादव, शिवसेनेच्या शारदा जाधव, आदेश जमदाडे, सरपंच निखिल झगडे, आयुक्त लहुराज माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, तहसिलदार विवेक जाधव, गटविकास अधिकारी दिपा बापट आदी मान्यवर उपस्थित होते.

 मंत्री पंकजाताई मुंडे  म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव व बेटी पढाव असा नारा दिला आहे. त्यांच्या नाऱयाला महाराष्ट्र शासनही खंबरीपणे साथ देत आहेत. माझी कन्या भाग्यश्री योजनेमुळे लोकांच्या विचारतही आता बदल होत आहेत. माझी कन्या भाग्यश्री प्रचार व प्रसिद्धी रथाला गावोगावी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कमवा व शिका योजनेंतर्गत 51 हजार युवक-यवुतींना कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातील 7 हजार मुली आज शिक्षण घेत काम करीत आहेत. मुलींच्या जन्माबाबतचे नकारात्मक विचार बदलण्यासाठी तुम्हीही ठामपणे उभे रहा. तुम्ही भाग्यश्री आहात शासनाची ताकद तुमच्या पाठीशी आहे.

 अस्मिता योजनेतुन 5 रूपयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन

 उद्योग उभारणीसाठी महिला बचत गटांना शासन शून्य टक्के व्याजदराने पैसे उपलब्ध करुन देते. याचा बचत गटांनी लाभ घेवून आपली आर्थिक उन्नती करावी. शाळा, मुलींना विकासाला डोळ्यासमोर ठेवून शासन विविध योजना राबवित आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थींनींचे आरोग्य चांगले रहावे यासाठी अस्मिता योजनेतून 5 रुपयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचे प्रतिबिंब तुमच्यात दिसले पाहिजे, यासाठी शिक्षण महत्वाचे आहे.  

अंगणवाडी सेविकांचे थकित मानधन लवकरच

  कुपोषणमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान मिळणार आहे. त्यांच्या थकीत वाढीव मानधनाबाबत येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असून पोषण आहाराच्या देयकांचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल.    ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी आल्यावर चांगली ऊर्जा मिळते. या ठिकाणी भव्य सृष्टी निर्माण करण्यासाठी पर्यटन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शेवटी दिले.