|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आंतरजिल्हा बदली प्रतीक्षेतील शिक्षकांना दिलासा

आंतरजिल्हा बदली प्रतीक्षेतील शिक्षकांना दिलासा 

शासनाकडून नव्याने परिपत्रक, जिल्ह्य़ातील रिक्त पदांची कमी टक्केवारी

सुमारे 700 हून अधिक शिक्षक बदलीतून होणार मोकळे

प्रतिनिधी /रत्नागिरी

प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांविषयी शासनाने नव्याने परिपत्रक काढल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हय़ातील शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेता आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 700 हून अधिक शिक्षकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

शासकीय सेवेची पहिली नियोजित वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर आंतरजिल्हा बदल्यांच्या कार्यवाहीचे शिक्षकांना वेध लागतात. रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागात आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांचे प्रस्ताव दाखल झाले. मागील काही दिवसांपूर्वी या आंतरजिल्हा बदल्यांच्या कार्यवाहीवरून जिल्हा परिषद प्रशासनाने कडक धोरण स्वीकारले होते. जिल्हय़ातील शिक्षकांची रिक्त पदे व आंतरजिल्हा बदलीने जाणाऱया शिक्षकांची असलेली मोठी संख्या ही बाब चिंतेचा ठरत होती. त्याचा परिणाम जिल्हय़ातील कार्यरत शिक्षक पदांवर जाणवू लागला. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने जाणाऱया शिक्षकांना न सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

जिल्हा परिषदेच्या एकूण 2 हजार 748 प्राथमिक शाळा आहेत. या शिक्षकांची अनेक पदे रिक्त येथील शैक्षणिक कामकाजावर निश्चितच जाणवत आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे काही शाळांत आवश्यकता असूनही एक शिक्षक तर काही शाळांमध्ये आवश्यकता नसूनही शिक्षकांचा मोठा भरणा, अशी स्थिती जाणवत आहे. त्यामुळे या बदल्यांच्या कार्यवाहीतून होणाऱया रिक्त पदांमुळे येथील यंत्रणेवर परिणाम होताना दिसून येतो. या बाबत भाजपानेही विरोध दर्शवत ही बाब शासनाकडे मांडली होती.

मात्र शासनाच्या प्रधान सचिवांकडून आंतरजिल्हा बदल्यांबाबत नव्याने परिपत्रक काढण्यात आले आहे. 10 टक्क्यापेक्षा अधिक रिक्त पदे असलेल्या जिल्हय़ातील थेट बदल्या करू नयेत, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ातील ही टक्केवारी 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. एकूण शिक्षकांच्या तुलनेत या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांची संख्या 350 पर्यंत आहे. त्यामुळे नवीन संचमान्यतेने रिक्त पदांची संख्या निश्चित केली जाणार आहे. या बदल्यांसाठी आपसी बदल्यांचा पर्याय ठेवण्यात आला आहे.