|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चौगुले कंपनीच्या खाणीवर शेतकऱयांचा मोर्चा

चौगुले कंपनीच्या खाणीवर शेतकऱयांचा मोर्चा 

प्रतिनिधी /डिचोली :

मये व शिरगाव डोंगलमाथ्यावर कार्यरत असलेल्या चौगुले खाण कंपनीवर मये गावातील शेतकऱयांनी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी भव्य मोर्चा नेला. 2010 ते 2013 या काळातील सदर नुकसानभरपाई अजून कंपनी देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱयांनी चौगुले कंपनीच्या पैरा मये येथील कार्यालयावर धडक मोर्चा नेला. कंपनी अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन पुन्हा चर्चा करण्यात आली. नुकसानभरपाई मिळेपर्यंत कंपनीच्या गेटसमोर ठाण मांडून बसणार असल्याचा पावित्रा शेतकऱयांनी घेतला.

भारतीय किसान सभेचे कमलाकांत गडेकर व मयेतील युवानेते संतोषकुमार सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱयांनी हा मोर्चा काढला. भूगर्भखाते, मामलेदार, उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी पणजी आदी न्यायालयांनी शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्याचा निवाड दिला असतानाही चौगुले कंपनी त्यांचा अवमान करत आहे. सेसा खाण कंपनीने 2 कोटी 80 लाख रुपये नुकसानभरपाई दिलेली आहे, मात्र चौगुले कंपनी माघार घेते, असे गडेकर यांनी सांगितले.

1970 सालापासून ही कंपनी मयेची लूट करीत आहे. मोठय़ा प्रमाणात खनिज संपत्ती या कंपनीने नेलेली आहे. येथील शेती बागायती, तलाव, नाले नष्ट केलेले आहेत. सर्वत्र प्रदूषण करून कंपनीने शेतकऱयांना कंगाल बनविले आहे. तरीही शेतकऱयांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई टाळाटाळ केली आहे, असे गडेकर यांनी उपजिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी मामलेदार मधू नार्वेकर, पोलीस निरीक्षक संजय दळवी, युवानेते संतोषकुमार सावंत आदी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी कंपनीला शेतकऱयांची नुकसानभरपाई देऊन हा विषय संपविण्याचा सल्ला दिला. कंपनीच्या अधिकाऱयांनी मात्र न्यायालयात खटला चालू असल्याचे कारण पुढे केले. त्यांची कागदपत्रे सादर करण्यास कंपनीचे अधिकारी अपयशी ठरल्याने याविषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱयांनी आज शुक्रवार 16 रोजी पुन्हा बैठक बोलाविली आहे. यावेळी कंपनीचे सरव्यवस्थापक चोडणकर व अन्य उपस्थित होते.