|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बारावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

बारावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू 

प्रतिनिधी/ ढेबेवाडी

बारावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या दुचाकीला अपघात झाला. पाचुपतेवाडी-गुढे येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा कराड येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. प्रथमेश परशुराम पाटील (रा. मोरेवाडी पाटील वस्ती, कुठरे, ता. पाटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, विद्यार्थ्याच्या मृत्यूने मोरेवाडी परिसरावर शोककळा पसरली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रथमेश पाटील हा तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेत होता. इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱया प्रथमेशची नुकतीच बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली होती. प्रथमेश नेहमीप्रमाणे परीक्षेसाठी महाविद्यालयात आला होता. पेपर झाल्यानंतर तो दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाला होता. पाचुपतेवाडी-गुढे गावच्या हद्दीत आल्यावर त्याच्या दुचाकीला अनोळखी वाहनाने धडक दिली. धडक एवढी जोरात  होती, की प्रथमेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तत्काळ कराडच्या कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना प्रथमेशचा मृत्यू झाला. बारावीचा पेपर देऊन परत येणाऱया प्रथमेशच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या मित्रपरिवारालाही या घटनेने मानसिक धक्का बसला आहे.

Related posts: