|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवणातील बांधकामांच्या सर्वेक्षणाचे आदेश

मालवणातील बांधकामांच्या सर्वेक्षणाचे आदेश 

राज्य शासनाच्या पर्यावरण सचिवांचे निर्देश : प्रत्येक बांधकामाच्या फोटोसह अहवाल होणार तयार : चार पथके नियुक्त

मनोज चव्हाण / मालवण:

मालवण शहरासह किनारपट्टीवरील रेवंडी, तोंडवळी, कोळंब, आचरा, सर्जेकोट, वायंगणी येथे सर्व बांधकामांचे सर्वेक्षण तात्काळ करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या पर्यावरण सचिवांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशाने तहसीलदार समीर घारे यांनी बांधकामांच्या सर्वेक्षणासाठी चार पथकांची नियुक्ती केली असून 1 मार्चपासून हे काम सुरू होणार आहे. यात प्रत्येक बांधकामाचा फोटोसह अहवाल सादर करण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडे ऑनलाईन सातबार नोंदीचे काम असताना आता बांधकामाच्या सर्वेक्षणाचे काम सोपविण्यात आल्याने धावपळ उडण्याची शक्यता आहे.

मालवण शहरासह अनेक किनारपट्टीवरील गावांत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण सचिवांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. महसूल विभागाच्या या सर्वेक्षणावर अनेकांची दांडी उडण्याचीही शक्यता आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर योग्य कारवाई झालेली आहे की नाही, याचाही अहवाल तयार होणार आहे. त्यामुळे बेकायदेशीर बांधकामे केलेल्यांची पुढील तीन दिवसांत पळापळ होण्याची शक्यता आहे. हा अहवाल तीन दिवसांत बनविणे शक्य नसल्याने कमीत कमी पंधरा दिवस ते एक महिना हे काम चालण्याची शक्यता आहे.

निवासी नायब तहसीलदार पर्यवेक्षण अधिकारी

निवासी नायब तहसीलदार एस. पी. खडपकर यांची पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पथक 1-मालवण शहराचे सर्वेक्षण पथकप्रमुख एम. सी. तपकीरकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यात तलाठी डी. व्ही. तेली, एम. जी. गवस, डी. सी. सिंगनाथ, एस. ए. दळवी, कोतवाल एस. एस. साळकर, ए. डी. शिंदे, एच. बी. देऊलकर. पथक 2-रेवंडी, कोळंब, सर्जेकोट, आचरा या गावचे सर्वेक्षण आचरा मंडळ अधिकारी एम. पी. पारकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यात तलाठी व्ही. व्ही. कंठाळे, ए. आर. राणे, एम. आर. नारकर, बी. डी. नेरकर, ए. बी. काळे, डी. आर. सावंत, कोतवाल एस. डी. आजगावकर, एस. के. पाताडे, जी. आर. घाडी यांचा समावेश आहे. पथक 3-तोंडवळी आणि वायंगणी गावचे सर्वेक्षण मसुरे मंडळ अधिकारी आर. व्ही. निपाणीकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यात तलाठी पी. डी. मसुरकर, डी. व्ही. शिंग्रे, व्ही. एन. पास्ते, एस. एम. अरखराव, जी. आर. परब, कोतवाल एच. एल. घाडीगावकर, व्ही. एस. गुरव, व्ही. डी. पोयरेकर यांचा समावेश आहे. पथक 4-वायरी, देवबाग, तारकर्ली या गावचे सर्वेक्षण पेंडुर मंडळ अधिकारी एस. आर. चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. यात तलाठी आर. आर. तारी, जे. एस. साईल, डी. जी. सावंत, एस. पी. मालवणकर, एस. बी. परब, कोतवाल एम. एस. कुर्ले, पी. पी. मालंडकर, पी. एस. गोसावी यांचा समावेश आहे.

जबाबदारी निश्चित करण्यात येणार

राज्य पर्यावरण विभागाच्या सचिवांच्या निर्देशाने आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशाने मालवणातील गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱयांनी आपल्या कामात कोणतीही हयगय अथवा टाळाटाळ केल्यास अगर चुकीच्या पद्धतीचा अहवाल सादर केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून नियमोचित कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट निर्देश तहसीलदार घारे यांनी बजावले असल्याचे समजते.

असे होणार सर्वेक्षण

सर्वेक्षण करताना अनधिकृत बांधकामाचा ग्रामपंचायत घर नंबर, बांधकाम कोणाची नावे नमूद आहेत, त्याचे नाव, बांधकाम समुद्र अथवा खाडीपासून नक्की किती अंतरावर आहे, बांधकामाचे वर्गीकरण, बांधकामाखालील क्षेत्र, रस्त्यापासून बांधकामाचे अंतर अशा पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जबाब, पंचयादी, नकाशासह अहवाल बनविण्यात येणार आहे. यात वायरी, देवबाग, तारकर्ली येथील 2017 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून वगळण्यात आलेल्या बांधकामांची नोंद आताच्या सर्वेक्षणामध्ये करायची आहे. यात प्रत्येक प्रकरणी स्वतंत्र जबाब, पंचनामा, सातबारा, असेसमेंट उतारा, बांधकाम केलेले वर्ष, नूतनीकरणाचे वर्ष, दुरुस्तीचे वर्ष नमूद करण्यात येणार आहे.