|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » बजरंग पुनिया, विनोद कुमारला कांस्यपदके

बजरंग पुनिया, विनोद कुमारला कांस्यपदके 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय मल्ल बजरंग पुनिया व विनोद ओमप्रकाश कुमार यांनी कांस्यपदकाच्या लढती जिंकत किर्गिस्तानमधील बिश्केक येथे सुरु असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाला आणखी यश प्राप्त करुन दिले. सध्याच्या घडीला या यशानंतर भारताच्या खात्यावर 8 पदके नोंद झाली असून त्यात 1 सुवर्ण, 1 रौप्य व 6 कांस्यपदकाचा समावेश आहे.

65 किलोग्रॅम फ्री स्टाईल इव्हेंटमध्ये पुनियाने इराणच्या योनेस अलियाक्बर इमामिचोघईला नमवत कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली तर विनोद कुमारने 70 किलोग्रॅम वजनगटात यजमान किर्गिस्तानच्या इलामन डोग्दुर्बेक उलूला पराभवाचा धक्का दिला. पुनियाने योनेसला 10-4 अशा फरकाने नमवले असले तरी यातील फरकाइतके वर्चस्व पुनियाला प्रारंभी गाजवता आले नव्हते. उलटपक्षी, पुनिया 6 मिनिटांच्या लढतीत तब्बल 4 मिनिटे योनेसपेक्षा मागेच होता.

इराणच्या योनेसने पहिल्या 30 सेकंदातच 2-0 अशी आघाडी घेतली होती. पुनियाने अपवादाने ब्रेकपूर्वी 2-2 अशी बरोबरीही प्राप्त केली. पहिल्या सत्राचीच पुनरावृत्ती दुसऱया सत्रातही झाली. येथेही योनेसने आक्रमक सुरुवात केली आणि पुनियाने नंतर दोन मिनिटांचा अवधी बाकी असताना त्याच्याशी बरोबरी साधली. त्यानंतर मात्र त्याने सलग पंच मारत लढतीत विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, ताजिकिस्तानच्या अब्दुलकासिम फायझिव्हला नमवत त्याने कांस्यपदकाच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

विनोदचाही पदकासाठी संघर्ष

आणखी एक कांस्यजेताविनोद व किर्गिस्तानचा त्याचा प्रतिस्पर्धी इलामन यांच्यातील लढतही चुरशीची ठरली. इलामनने प्रारंभीच 1-0 अशी आघाडी घेतली व नंतर ती 3-1 अशी भक्कमही केली. पण, विनोदने केवळ 10 सेकंदाचा अवधी बाकी असताना दुहेरी गुण मिळवले आणि 3-3 अशी बरोबरी साधली. नंतर रेफ्रीनी विनोदला विजयी घोषित केले. विनोदने त्यापूर्वी उझबेकिस्तानच्या इख्तियोर नॅव्हरुझोव्हला नमवत कांस्यपदकाच्या लढतीसाठी आपले स्थान निश्चित केले होते.