|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगांची जय्यत तयारी

श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगांची जय्यत तयारी 

प्रतिनिधी / सातारा

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रेणेते जगत्विख्यात अध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर हे प्रथमच शाहूनगरीत येत असून यानिमित्त होणाऱया गुरुसानिध्य, युवाचार्य संमेलन व महासत्संग कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महासत्संगास जिल्हाभरातून एक लाख नागरिकांची उपस्थिती लाभणार असून सर्व कार्यक्रमांचे चोख नियोजन करण्यासाठी संयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे मीडिया प्रतिनिधी व महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे मेंबर अमोल येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री श्री रविशंकर यांचे आगमन झाल्यानंतर सकाळी 10. 30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खास निमंत्रितांसाठी गुरुसानिध्य कार्यक्रम होणार असून राज्यभरातून येणाऱया साधकांना गुरुदेव मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी साधकांना ऑनलाईन नोंदणी करावयाची असल्याचे सुधीर घार्गे यांनी सांगितले. तर युवाचार्य संमेलन हे साताऱयातील कार्यक्रमांपैकी महत्वाचा कार्यक्रम असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून  पाच हजार प्रशिक्षित युवक उपस्थित राहणार असल्याचे अमोल येवले यांनी सांगितले. ते म्हणाले, ग्रामीण भागात आदर्शग्राम निर्मितीसाठी हे युवक विविध सेवा उपक्रम राबवत आहेत. योग आणि उद्योग म्हणजे योगातून आदर्श समाज घडवत असताना त्या समाजातील युवकांना रोजगाराच्या संधीही मिळाल्या पाहिजेत. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे काम सुरु आहे.

साताऱयात होणाऱया युवाचार्य संमेलनात योग व उद्योग तसेच कौशल्य विकासातून राष्ट्राच्या निर्मितीबाबत युवा साधकांना तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. भारत सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून 700 पेक्षा जास्त युवकांना योग शिक्षक व योग प्रशिक्षकाचे प्रशिक्षण आर्ट ऑफ लिव्हिंगने दिले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या साधकांना या संमेलनात प्रमाणपत्र वितरण केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतर्गंत आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे प्रशिक्षण देण्यात आले असून या योजनेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

या संमेलनास कौशल्य व विकास मंत्रालय भारत सरकार व ग्रामीण विकास मंत्रालय महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार असून योग व उद्योग याचा समन्वय साधून ग्रामीण भागातील युवक आदर्श गावाच्या निर्मितीत योगदान देण्याबरोबरच स्वतःचे जीवनमान कसे उंचावू शकतो, याबाबत महाराष्ट्रभरातून येणारे यशस्वी तरुण संमेलनात अनुभव कथन करणार असल्याचे अमोल येवले यांनी सांगितले.

ज्ञान, ध्यान व गान असा त्रिवेणी संगम असलेला श्री श्री रविशंकर यांचा महासत्संग हा वेगळी अनुभूती व नवी उर्जा प्रेरित करणारा असून सैनिक स्कूल मैदानावर एक लाख लोकांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत होणाऱया या कार्यक्रमासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. या महासत्संगाचे नियोजन अंतिम टप्यात आहे. यामध्ये महासत्संगासाठी शहरातून येणाऱया नागरिकांसाठी जिल्हा परिषद मैदानावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे तर ग्रामीण व बाहेरील शहरातून येणाऱयासाठी हायवेवरील ठक्कर सिटी येथे असलेल्या भव्य जागेत वाहन पार्किंगची सोय करण्यात आली असल्याचे सुधीर घार्गे यांनी सांगितले. युवा संमेलनाचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा तसेच महासत्संग सोहळयास नागरिकांनी शिस्तबध्दपणे उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे करण्यात आले आहे. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी संजय खटावकर, यतीन जोशी उपस्थित होते.