|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘स्वाभिमानी’ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

‘स्वाभिमानी’ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश 

प्रतिनिधी./ सांगली

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर स्वाभिमानी विकास आघाडीतील नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या निवडणुका युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची माहिती, स्वाभिमानी विकास आघाडीचे सचिव व नगरसेवक गौतम पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी नगरसेवक बाळू गोंधळे, नगरसेवक शिवराज बोळाज, हेमंत खंडागळे, माजी नगरसेवक रवि देवळेकर, सॅमसन तिवडे, रेखा पाटील आदी उपस्थित होते. गौतम पवार म्हणाले, खासदार गजानन कीर्तिकर सांगली दौऱयावर असताना त्यांनी शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत निवडणुकांसंदर्भात जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली होती. या पार्श्वभूमिवर सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही बैठक पार पडली. या बैठकीत पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सेना सर्व जागा लढविणार असल्याचा निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमिवर स्वाभिमानी विकास आघाडी व संभाजी पवार पेमी गटाने शिवसेनेत केला असून पूर्ण ताकदीने या निवडणुका लढविण्यात येणार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका संगीता खोत, मनसेचे नगरसेवक दिगंबर जाधव यांच्याशीही चर्चा केली असून ते याबाबत लवकरच निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पक्षीय व वैयक्तिक पातळीवर पक्षाच्या भूमिका बदलत आहेत. विविध पक्षांतील नेत्यांनी मिळून स्वाभिमानी विकास आघाडी बनविली होती. स्वाभिमानीतील काही नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत. मात्र उर्वरित नगरसेवक शिवसेना या चिन्हावर निवडणुका लढविणार आहेत.

भाजपाबरोबर युतीसाठी प्रयत्न

शिवसेना पक्ष म्हणून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपाबरोबर युती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर युतीसाठी जनता दल व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांनाही विचारणार करणार आहे. शिवसेनेचे काही नगरसेवक या निवडणुकीत निश्चितच निवडून आणणार असून सर्वच पक्ष कर्नाटक निवडणूकीचा धडा घेतील. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी प्रदीर्घ काळ महापालिकेत काम केले आहे. महापालिकेतील दुरवस्थेबाबत हेच दीर्घकालीन सत्ताधारी जबाबदार आहेत. परिवर्तन ही जनतेची इच्छा आहे. पतंगरावांच्या निधनामुळे शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेस विरोधी प्रवाह एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. या युतीबाबत खासदार गजानन कीर्तिकरांसोबत चर्चा केली असून अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असणार आहे.

शिवसेना नेते संभाजी पवार यांच्या बंगल्यावर शिवसेना पदाधिकाऱयांची याबाबत बैठक पार पडली असून महापालिका निवडणुकींसाठी व्यूहरचना बनविण्यात आलेली आहे. जनतेने महापालिकेत बसून केवळ राजकीय खेळय़ा खेळण्यात धन्यता मानणाऱया नेत्यांना हाकलून चांगल्या लोकांच्या हाती सत्ता द्यावी व परिवर्तन घडवावे, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी संभाजी पवार यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: