|Sunday, October 21, 2018
You are here: Home » Top News » सफरचंद बाजूला काढले म्हणून लग्न घरातील लोकांनी त्याचा जीव घेतला

सफरचंद बाजूला काढले म्हणून लग्न घरातील लोकांनी त्याचा जीव घेतला 

ऑनलाईन टीम / नागपूर :

लग्न समारंभात केटरिंगसाठी आलेल्या कामगाराने लग्न समारंभ संपल्यावर फक्त 4 सफरचंद बाजूला काढून ठेवल्याच्या कारणांवरून त्याला लग्न घरातील लोकांनी बेदम मारहाण केली. जबर मारहाण झाल्यामुळे त्याला जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असता, अखेर त्याचा उपचारादरम्याण मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी आता 15 जणांविरोधात हत्या, दंगल, आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तीस वर्षांचा स्वप्नील डोंगरे आपल्या आईचा एकमेव कमावता आधार होता. मात्र, काही लोकांच्या क्षणिक रागात त्याचा नाहक बळी गेला आहे. स्वप्नील गेल्या अनेक वर्षांपासून लग्न समारंभात केटरिंगच्या कामात प्रूट सलाडच्या स्टॉलवर काम करायचा. 3 मे रोजी तो क्वेटा कॉलनी पाटीदार भवन येथे वाघेला कुटुंबियांच्या लग्न समारंभात प्रूट सलाडचा स्टॉल सांभाळत होता. साडे अकरा वाजता समारंभ संपल्यानंतर, स्वप्नीलने राहिलेल्या फळांमधून 4 सफरचंद बाजूला काढून ठेवले. वाघेला कुटुंबीयांपैकी काहींनी ते पाहिले आणि स्वप्नीलला बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱयांपैकी काहींनी स्वप्नीलला ओढून लाथा मारल्या. त्यात त्याच्या पोटात अंतर्गत जखमा झाल्या. इतर केटरिंग सहकाऱयांनी स्वप्नीलला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र वाघेला कुटुंबातील लोकांनी त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या स्वप्नीलचा वेगवेगळय़ा रूग्णालयात उपचार झाला. मात्र जबर मारहाणीत त्याचे आतडे आणि यकृत अर्थात लिव्हरला जबर दुखापत झाल्यामुळे, 10 मेच्या रात्री मृत्यूसोबतची त्याची झुंज अपयशी ठरली. सखोल तपासाअंती पोलिसांनी या प्रकरणात 15 जणाविरोधात दंगल घडविणे, हत्या आणि ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवत, योगेश वाघेला आणि रसिक वाघेला या दोघांना अटक केली आहे.

Related posts: