|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » यंदाचे प्रबळ दावेदार

यंदाचे प्रबळ दावेदार 

यापूर्वी 2014 फिफा फुटबॉल विश्वचषक फायनलमध्ये जर्मनीने अर्जेन्टिनाला 1-0 अशा फरकाने नमवले आणि झळाळत्या चषकावर आपली मोहोर उमटवली. यंदाही 14 जूनपासून सहभागी 32 संघ जेतेपदासाठी निर्धाराने मैदानात उतरतील, त्यावेळी नव्याने युद्धाची ठिणगी पडत राहील. त्या पार्श्वभूमीवर सर्व संघांची सारासार ताकद पाहता, प्रबळ दावेदारात विद्यमान जेते जर्मनी, उपजेते अर्जेन्टिनासह ब्राझील, स्पेन व फ्रान्स हे संघ आघाडीवर असू शकतात.

विद्यमान विजेते जर्मनी

जर्मनी हे विद्यमान विश्वचषक विजेते. 2014 विश्वचषक फायनल्समध्ये मॅरिओ गोत्झेने आंद्रे स्कर्लच्या पासवर अवांतर वेळेत सर्जिओ रोमेरोचा बचाव भेदला आणि जर्मनीने विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली. अमेरिकन भूमीत विश्वचषक जिंकणारा तो पहिला युरोपियन देश ठरला. त्यानंतर जर्मनीतील फुटबॉल गुणवत्ता प्रचंड वाढली आहे. काही युवा खेळाडू अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर पराक्रम गाजवण्यासाठी पूर्ण सज्ज झाले आहेत. कागदावर आणि पिचवर देखील हा संघ भक्कम भासतो.

विश्वचषक पात्रता फेरीत ते अव्वल ठरले आहेत आणि आता सलग जेतेपदाच्या निर्धारानेच ते मैदानात उतरणार आहेत. ताज्या दमाचे व अनुभवी खेळाडूंचा उत्तम मिलाफ या संघात दिसून येतो. लेरोय सेन, किमिच, वेर्नर हे युवा खेळाडू तर थॉमस म्युलेर, मार्को रेऊस, टोनी क्रूस, मेसूत ओझिल, मॅट हम्मेल्स, जेरोम बोएतेंग व मॅन्युएल नेयूर यांचा त्यात प्राधान्याने समावेश होतो.

 

डिवचले गेलेले ब्राझील

मागील विश्वचषकातील उपांत्य लढतीत ब्राझीलला जर्मनीकडून 1-7 अशा फरकाने अतिशय नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच्या जखमा ब्राझीलसाठी अजूनही भरल्या गेलेल्या नाहीत. आताही ते डिवचलेलेच आहेत. पण, अशा प्रतिकूल स्थितीत त्यांनी त्या चुकांचा बोध घेतला आहे का, हे यंदाच्या विश्वचषकात रशियन भूमीत दिसून येईल. 2014 च्या तुलनेत या संघात बरेच बदल घडले असून पात्रता फेरीत त्यांनी थोडेथोडके नव्हे तर 41 गुण घेतले, यावरुन त्याची कल्पना येईल. गटात दुसऱया स्थानासह पात्र ठरलेला उरुग्वेचा संघ त्यांच्यापेक्षा 10 गुणांनी मागे राहिला.

ब्राझीलचे नेतृत्व नेमारसारखा दिग्गज भूषवत असून स्वतःचे उदाहरण समोर ठेवत सहकाऱयांकडून अपेक्षित कामगिरी करुन घेण्याची त्याच्याकडून अपेक्षा असेल. फिर्मिन्हो व जीजस हे त्याचे आघाडी फळीतील सहकारी असतील. याशिवाय, डग्लस कोस्टा व विल्यन उपलब्ध असतील. मार्सेलो व थियागो यांच्यावर बचावफळीची भिस्त असणार आहे. फिलीप कुटिन्हो व प्रेड यांची कल्पकता बहरली तर ब्राझील प्रबळ दावेदार असेल.

 

ताज्या दमातील स्पेन

2010 चा विश्वचषक जिंकला, त्यावेळी स्पेनने फुटबॉल इतिहासातील सर्वोच्च शिखर गाठले. त्यांनी 2008 व 2012 साली युरो जेतेपदही संपादन केले. अर्थात, 2013 कॉन्फेडरेशन चषक स्पर्धेत ब्राझीलकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांची घसरण सुरु झाली.

2014 विश्वचषकात ते चक्क साखळी फेरीतच गारद झाले आणि युरो 2016 मध्ये इटलीने अंतिम 16 संघांच्या फेरीत त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. तरीही, त्यांनी अलीकडील कालावधीत उत्तम संघबांधणी केली असून सर्जिओ रामोस, गेरार्ड पिक्यू, आंद्रेस इनेस्टा, सर्जिओ बस्केट्स व जोर्डी अल्बासारखे अनुभवी खेळाडू यंदा उत्तम बहरात आहेत. इस्को, मार्को ऍसेन्सिओ, ल्युकास व्हॅझक्यूज या युवा खेळाडूंसह कोके, दिएगो कोस्टा, डेव्हिड सिल्वा लक्षवेधी योगदान देऊ शकतात.

 

पुनरावृत्तीसाठी सज्ज फ्रान्स

मागील 3 वर्षांच्या कालावधीत फ्रान्सचे आघाडीचे खेळाडू विविध क्लब संघांकडून खेळताना उत्तम बहरात राहिले आहेत आणि हीच त्यांची यंदा जमेची बाजू आहे. युरो 2016 फायनलमध्ये ईडरच्या लेट-विनर गोलमुळे पोर्तुगालविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला असला तरी हा संघ देखील यंदा प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.

आता या संघाकडे इतके दर्जेदार खेळाडू आहेत की, मुख्य प्रशिक्षक दीडिएर डेशचॅम्प्स यांच्यासमोर कोणाला निवडायचे आणि कोणाला वगळायचे, हा खरा प्रश्न आहे. ऍन्टोईन ग्रिझमनकडे संघाचे नेतृत्व असून किलियन, ऑलिव्हर गिरोड, नॅबिल फेकिर यांच्याकडून त्यांना मुख्य अपेक्षा असतील. पॉल पोग्बा, थॉमस लेमर, ब्लेझ मॅतुईदी, न्गोलो हे मिडफिल्डर्स असतील. राफाएल व्हॅर्ने व सॅम्युएल उमटिती कोणत्याही आघाडीवीरांना रोखण्यासाठी सक्षम मानले जातात.

 

अर्जेन्टिना आक्रमक पवित्र्यात

यंदाचा विश्वचषक कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच, असा चंग बांधलेल्या अर्जेन्टिनाने यंदाही मजबूत संघबांधणी केली आहे. पण, अलीकडेच, त्यांना स्पेनविरुद्ध 0-6 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे, सांघिक बचाव आणखी भक्कम करण्यावर त्यांना भर द्यावाच लागेल. तसे पाहता, अर्जेन्टिनाचा संघ ज्या स्पर्धेत सहभागी होतो, तेथे वर्चस्व गाजवतो. पण, अंतिम फेरी त्यांना पार करता येत नाही, असे विश्वचषक 2014, कोपा अमेरिका 2015 व कोपा अमेरिका सेन्टेनेरियो 2016 स्पर्धेत दिसून आले. ल्युकास बिग्लिया, ख्रिस्तियन पॅव्होन, लॅन्झिनी, मार्कोस रोझो, झेवियर मॅस्केरानो यांच्यावर अर्जेन्टिनाची भिस्त असणार आहे. सर्जिओ ऍग्युरो व गोन्झॅलो हिग्यून आणि कर्णधार मेस्सी हे त्यांचे मुख्य स्ट्रायकर्स असतील. बेल्जियम, पोर्तुगाल, इंग्लंड हे संघ देखील मजबूत आहेत. पण, ते अधिक डार्क हॉर्सेस आहेत आणि प्रबळ दावेदार होण्याच्या उंबरठय़ापर्यंतच ते पोहोचू शकतील.

Related posts: