|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » बांगलादेश महिला संघाला रोख बक्षीस जाहीर

बांगलादेश महिला संघाला रोख बक्षीस जाहीर 

वृत्तसंस्था/ढाका

बांगलादेश महिला क्रिकेट संघाने महिलांची आशिया चषक स्पर्धा जिंकल्यानंतर बांगलादेशने संघाला रोख बक्षीस जाहीर केले आहे.

कौलालंपूर येथे नुकत्याच झालेल्या आशिया चषक टी-20 स्पर्धेत बांगलादेशने अंतिम फेरीत बलाढय़ भारताचा पराभव करून पहिल्यांदाच जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. भारताने ही स्पर्धा सहावेळा जिंकली आहे. विशेष म्हणजे साखळी फेरीतही त्यांनी भारताचा पराभव करून असा पराक्रम करणारा पहिला संघ होण्याचा मान मिळविला. सोमवारी या संघाचे बांगलादेशमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. बांगलदेश क्रिकेट मंडळाने त्यांना 20 दशलक्ष टका (236,000 डॉलर्स) रोख बक्षीस देण्याचे घोषित केले असून त्यांच्या मानधनातही लवकरच वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘संघातील प्रत्येक खेळाडूला 10 लाख टका (14,800 डॉलर्स) देण्यात येतील,’ असे बीसीबीचे प्रवक्ते जलाल युनुस यांनी सांगितले. 75,000 डॉलर्स प्रशिक्षक व व्यवस्थापन स्टाफ यांना वाटून देण्यात येणार आहेत,’ असेही त्यांनी सांगितले. याशिवाय करारबद्ध केलेल्या खेळाडूंचे मानधन व सामन्याचे मानधन यांचेही पुनरावलोकन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या त्यांना प्रत्येक महिन्यास 30,000 टका (445 डॉलर्स) आणि आंतरराष्ट्रीय सामन्यास 100 डॉलर्स सामना मानधन देण्यात येते.

Related posts: