पाणी-तुंबणे आणि साचणे

देवेंद्र (म्हणजे देवांचा राजा, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब नव्हेत) हे अतिशय खोडसाळ दैवत आहे असे आमचे मत आहे. रामायणपूर्व काळात या देवेंद्राने गौतम ऋषी आणि अहिल्या यांच्या संसारात विष कालवले होते. तेव्हा गौतम ऋषींनी देवेंद्राला शाप दिला आणि अहिल्येला पाषाणरूप दिले. नंतर प्रभू रामचंद्रांनी अहिल्येचा उद्धार केला. महाभारत काळात याच देवेंद्राने गोकुळात भीषण पाऊस पाडून भगवान श्रीकृष्णाला आणि गोकुळवासियांना त्रास दिला होता. मात्र भगवान श्रीकृष्णाने वेळीच गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि गोकुळाची मुंबई होता होता वाचली. भगवान श्रीकृष्णाने हे कृत्य खरोखर करून दाखवले.
मात्र देवेंद्राने असा दुष्टपणा करून देखील श्रीकृष्णाने देवेंद्रावर राग धरला नाही. कौरव-पांडवांचे इस्टेटीवरून युद्ध झाले तेव्हा श्रीकृष्णाने देवेंद्राचा पुत्र अर्जुनाला आणि पांडवांना युद्ध जिंकून दिले. मात्र अर्जुनाचा नातू परिक्षित राजाला तक्षकाने ठार केल्यावर जनमेजय राजाने तक्षकाला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवेंद्राने परिक्षित राजाची बाजू न घेता तक्षकालाच आश्रय देण्याचा प्रयत्न केला.
कलियुगात देखील देवेंद्र अस्सेच करतो. पावसाळा आला की तमाम देशवासीय पुणेकरांना बजावतात की पुणेकरांनो, पाण्याची उधळपट्टी करू नका. पाणी कपातीची तलवार सतत नागरिकांच्या डोक्मयावर असतेच. पुण्यातल्या नेत्यांना रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचा अद्भुत छंद आहे. त्यासाठी हवा असलेला पाऊस देवेंद्र पाडत नाही. मुंबईत मात्र दरवषी इतका धो धो पाऊस पाडतो की आदल्या महिन्यात स्वच्छ केलेले नाले तुंबतात, रस्ते जलमय होतात, घराघरात पाणी शिरते, तळमजले पाण्याने भरून जातात, रस्त्यावरील पाण्यात मोटारी तरंगताना दिसतात, लोकल सेवा ठप्प होते, आगगाडय़ा बंद पडतात आणि मुंबईला जाणे किंवा मुंबईहून परगावी जाणे अशक्मय होते.
आमच्या मते मुसळधार पाऊस पाडणे हा देवेंद्राचा मुंबईला देशापासून तोडण्याचा डाव आहे. पण अशी वाक्मये फक्त निवडणुकीच्या वेळी बोलायची असतात म्हणे. म्हणून आम्ही बोलत नाही.
पुढारी लोकांनी यंदा मराठीला नवे क्रियापद बहाल केले आहे. मुंबईत पाऊस पडतो तेव्हा पाणी तुंबत नाही, साचते. आमच्या एका मित्राची ज्या सहकारी बँकेत ठेव होती ती बँक बुडाली. तो म्हणाला, माझे पैसे बँकेत अडकले आहेत. मी त्याला म्हणालो, तुझे पैसे साठले आहेत. तो माझ्यावर नाराज झाला.