|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मत्स्य प्रक्रिया सेंटर उभारणार!

मत्स्य प्रक्रिया सेंटर उभारणार! 

मच्छीमार मेळाव्यात केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन

कोटमच्छीमारांना बर्फ बनविण्याचे छोटे मशिन, मासे वाळविण्यासाठी सोलर मशिन दिल्या जातील दीपक केसरकर, पालकमंत्री

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

कोकणाला चांगला समुद्र किनारा लाभला आहे. जेथे समुद्र किनारा आहे, तेथे मासेमारी व्यवसाय वाढत आहे. सध्या आपण मासे निर्यात करतो. मात्र, माशांवर प्ढ्रक्रिया होत नसल्याने मच्छीमारांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. कोकणातील मच्छीमारांना सुगीचे दिवस आणण्यासाठी लवकरच रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या मध्यवर्ती ठिकाणी मत्स्य प्रक्रिया सेंटर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले.

आधुनिक रापण मच्छीमार संघ व तालुका मच्छीमार बांधवांतर्फे आयोजित मच्छीमार मेळावा रविवारी येथील साई मंगल कार्यालयात झाला. यावेळी प्रभू बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, भाजप प्रदेश कार्यालय सचिव शरद चव्हाण, उपसभापती स्मिता दामले, आधुनिक रापण संघाचे अध्यक्ष दादा केळुसकर, अशोक सारंग, बाबा नाईक, बाबी रेडकर, गणपत केळुसकर, सरपंच मनोज उगवेकर, महेंद्र डिचोलकर, धुरी आदी उपस्थित होते.

प्रभू म्हणाले, गेली कित्येक वर्षे मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. येथील किनारपट्टीचे पर्यायाने देशाचे रक्षण करण्याचे काम मच्छीमार करीत आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे जीवनमान सुधारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. येथे होणाऱया मत्स्य प्रक्रिया सेंटरमध्ये माशांवर प्रक्रिया करुन ते जपान, कोरीया आदी देशात पाठवणे शक्य होणार आहे. यातून मच्छीमारांना आर्थिक लाभ मिळणार आहे.

वेंगुर्ले, शिरोडा, निवती येथे ब्रेकवॉटर प्रकल्प!

सागरमाला व बारा चॅम्पियन सेक्टरमधून 5 हजार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याची जबाबदारी प्रभू यांच्याकडे देण्यात आली आहे. या निधीतून वेंगुर्ले, शिरोडा व निवती येथील बंदरातील गाळ काढून मिळावा, या ठिकाणी ब्रेकवॉटर प्रकल्प सुरू करण्यासाठी आपण मच्छीमारांच्या प्रतिनिधींसोबत प्रभू यांची भेट घेतली होती. प्रभू यांनी ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

आपापसातील वाद मिटवा!

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आपण पालकमंत्री असल्याने पारंपरिक व आधुनिक मच्छीमारांचे हित पाहवे लागते. आधुनिक व पारंपरिक मच्छीमारांनी आपापसातील वाद स्थानिक पातळीवर मिटवावेत. मच्छीमारांमध्ये एकी नसल्याने गोवा, केरळ, गुजरात येथील ट्रॉलर सिंधुदुर्ग किनाऱयावर मासेमारी करीत आहेत. मच्छीमारांना बर्फ बनविण्याचे छोटे मशिन, मासे वाळविण्यासाठी सोलर मशिन दिल्या जातील. मात्र, ही यंत्रणा चालविण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, असे केसरकर म्हणाले.

यावेळी अशोक सारंग, बाबा नाईक, स्मिता दामले यांनी मनोगत व्यक्त केले. दादा केळुसकर यांनी स्वागत, तर बाबा नाईक यांनी आभार मानले.