|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मांद्रे कॉलेजवरील अन्याय मुख्यमंत्र्यांनी दूर करावा

मांद्रे कॉलेजवरील अन्याय मुख्यमंत्र्यांनी दूर करावा 

प्रतिनिधी/ मोरजी

ज्या मांद्रे मतदारसंघातून गोव्याचे भाग्यविधाते निवडून येऊन राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्या भाऊंनी बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडे उघडी केली त्याच भाऊंच्या मतदारसंघातील मांद्रे ऑफ कॉलेजवर विद्यमान सरकारने अन्याय होणे योग्य नव्हे. मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या कॉलेजवरील अन्याय दूर करून त्यांना आदरांजली वाहावी, असे प्रतिपादन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी केले. मांद्रे विकास परिषदेने आयोजित केलेल्या भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, मांद्रे सरपंच राजवी सावंत, उपसरपंच डेनिस ब्रिटो, माजी सरपंच अशोक मांद्रेकर, नारायण नाईक, पंच प्रिया कोनाडकर, पंच अश्वेता मांद्रेकर, पंच संजय बर्डे, पंच महादेव हरमलकर, पंच प्रदीप हडफडकर, प्रा. अरुण नाईक, प्रा. सीताराम आश्वेकर, प्रा. रामदास केळकर, मुख्याध्यापिका सुगंधा पार्सेकर, प्रा. अजय देसाई, प्रा. स्नेहल नाईक, प्रा. समीक्षा गावकर, प्रा. मंजू महाले, शरद गावडे आदी उपस्थित होते. सुरुवातीला भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अर्ध्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पुन आदरांजली वाहिली.

प्रा. सीताराम आश्वेकर व प्रा. अजय देसाई यांनी सूत्रसंचालन आणि स्वागत केले. प्रा. स्नेहल नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय केला. रुचा परब, रुपेश्री परब आदींनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रा. अरुण नाईक म्हणाले, भाऊंची लोकप्रियता अमाप होती. ते तेजस्वी महापुरुष होते. त्यांच्या डोळस नजरेतून अनेक प्रकल्प उभे राहिले ते आजपर्यंत चालू आहेत. अनेक कंपन्याही उभारल्या त्या चालू आहेत, असे सांगून आताच्या कंपन्या मात्र सरकारच्या सबसिडीवर डोळा ठेवून असतात व ते ती घेऊन पसार होतात.

सरपंच राजवी सावंत यांनी बोलताना भाऊसाहेब बांदोडकर यांनी कुळ मुंडकार यांचे रक्षण केले. त्यामुळे खऱया अर्थाने ते बहुजनाचे कैवारी होते असे सांगितले.

माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी बोलताना शिक्षणाची आस्था आणि आत्मियता भाऊसाहेबांना होती, ते त्याकाळात आमदार मंत्री नसतानाही दान देत होते ते दान उजव्या हाताला कळत नव्हते असे सांगितले.