|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बनावट सोने तारण प्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा

बनावट सोने तारण प्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा 

बँक ऑफ इंडीयाला 51 लाखांचा गंडा

सोनाराच्या मदतीने कडवई शाखेची फसवणूक

शाखाधिकाऱयांची पोलिस ठाण्यात तक्रार

‘तरुण भारत’ने केला होता पर्दाफाश

वार्ताहर /संगमेश्वर

सोनाराला हाताशी धरून बनावट सोने तारणाद्वारे बँक ऑफ इंडियाला 51 लाखांना गंडा घालणाऱया 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार महिन्यांपुर्वी ‘तरुण भारत’ ने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर वेगवान चक्रे फिरून अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खोटे सोन्याद्वारे फसवणूक होण्याची संगमेश्वर तालुक्यातील हा पहिलाच प्रकार आहे.

बँक ऍाफ इंडियाच्या कडवई शाखेचे शाखाधिकारी प्रेम सागर हरनारायन गुप्ता यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात या फसवणूक प्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार 14 सप्टेंबर 2016 ते 21 एप्रिल 2018 या तीन वर्षात फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. अस्लम युनूस फणसोपकर (रा. तुरळ), अरुण प्रभाकर पंडित, मानसी महेश पंडित, सखाराम गंगाराम कानाल, संजय यशवंत पवार, सुर्यकांत सिताराम पंडित, वंदना संजय पवार (सर्व रा. चिखली), रामचंद्र सदाशिव अनेराव, शालीनी रामचंद्र अनेराव (दोघेही रा. शिंदे आंबेरी), रुपाली दिलीप ब्रिद (रा. मासरंग), सरिता रमेश सागवेकर (रा. कडवई बाजारपेठ), सुजाता चंद्रकांत करजेकर रा. (रांगव कुंभारवाडी), विजय वसंत कडवईकर (रा. सुतारवाडी), सतीश शांताराम चाळके (रा. तांबेडी) या 14 जणांनी बँक ऑफ इंडिया शाखा कडवईचे प्राधिकृत सुवर्णकार दिलीप रामचंद्र पंडित यांच्याशी संगनमत साधून ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या सर्वानी मिळून संगनमताने बनावट सोन्याचे 3623.66 ग्रॅम वजनाचे दागिने बँकेत ठेवून ते खोटे असतानाही खरे असल्याचे प्रमाण दिले व बँकेतून 51,25,820.23 रक्कम कर्ज म्हणून उचलली आहे.

ब्ँाकेचा विश्वासघात करुन बँकेतूनही ही रक्कम काढून फसवणूक केली असल्याचे शाखाधिकारी यांच्या फिर्यादीत म्हटलेले आहे. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहेत.

तरूण भारतकडून पर्दाफाश

संगमेश्वर तालुक्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेत खोटे सोने तारण ठेवून लाखोंचा गंडा घातल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने 5 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होत. त्यानंतर संबधित यंत्रणा खडबडून जागी झाली होती. राष्ट्रीयकृत बँकेत झालेल्या फसवणुकीच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.