|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रक्षाबंधन करून परतताना दोघांवर काळाचा घाला

रक्षाबंधन करून परतताना दोघांवर काळाचा घाला 

वार्ताहर / खानापूर

गोव्यात राहाणाऱया बहिणीच्या घरी रक्षाबंधनसाठी आपल्या मित्रासोबत गेलेल्या चौघांच्या स्वीप्टला बेळगाव-खानापूर महामार्गावरील गणेबैल-इदलहोंड दरम्यान समोरून येणाऱया बसने ठोकरल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. अन्य दोघे गंभीर झाल्याची घटना सोमवारी दुपारी 3.30 च्या सुमारास घडली.

अपघातात स्वीप्ट चालक दामोदर तानाजी टिमले (वय 30 सुभाष गल्ली, गांधीनगर, बेळगाव) व रमेश अशोक ताशीलदार (वय 30 कसाई गल्ली, बेळगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. दिनेश रामजी (वय 22 कसाई गल्ली बेळगाव)  व दीपक जाधव कुदनूर (महाराष्ट्र) सध्या रा. कंग्राळी के. एच. अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती की, सदर चौघेजण रविवारी गोव्यातील जांभवली भागात राहणाऱया बहिणीच्या घरी राखी बांधून घेण्यासाठी दामोदर टिमले व दीनेश रामजी हे आपल्या गाडीमधून मित्रासमवेत गेले होते. सोमवारी अनमोडमार्गे बेळगावला येत असताना कोल्हापूरहून खानापूरकडे येणाऱया खानापूर बस आगाराच्या (केए 22 एफ 1422) या कोल्हापूर-हल्याळ बसने दुसऱया वाहनाला बाजून देताना स्वीप्टला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात घडला. अपघात इतका भयानक होता की, चौघेही स्वीप्टमध्ये अडकून तडफडत होते. अपघात घडताच बसचालकाने पलायन केले. बस पूर्णतः प्रवाशांनी भरली होती. अपघाताची माहिती मिळताच गणेबैल व इदलहोंड क्रॉसजवळील लोकांनी जखमींना बाहेर काढले. त्यामध्ये रमेश ताशीलदार हा जागीच ठार झाला होता. तर दामोदर टिमले हा जखमी अवस्थेत तडफडत होता. तर अन्य दोघां जखमींच्या नाका-तोंडातून रक्त येत होते. त्यांना रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. पण तेथे पोहोचण्यापूर्वीच दामोदर यांचा मृत्यू झाला. अन्य दोघेजण दिनेश व दीपक यांना अधिक उपचारासाठी केएलई रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची परिस्थितीही गंभीर असल्याचे समजते. दामोदर हा दुबईतील शिपिंग कंपनीमध्ये कामाला होता. रक्षाबंधनसाठी तो बेळगावला होता. तेथून तो आपल्या बहिणीकडे गोव्याला गेला होता.

संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या

अपघात घडताच स्वीप्ट बसमध्ये पूर्णतहा अडकली होती. त्यावेळी संतप्त जमावाने बसवर दगडफेक करून बसच्या पाठिमागील काचा फोडल्या. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. स्वीप्टचा समोरील भाग चालकाच्या सीटपर्यंत दाबल्यामुळे समोर बसलेला चालक दामोदर व रमेश हे गंभीर जखमी झाल्याने ठार झाले. तर पाठीमागील दोघेजण जखमी झाले.

रुग्णवाहिका येण्यास विलंब

अपघात घडताच स्वीप्टमधील जखमींना तातडीने नागरिकांनी बाहेर काढले व खानापूर 108 रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. व रुग्णवाहिका अपघातस्थळापर्यंत येण्यास तब्बल पाउणतास लागला. त्यामुळे उपस्थित जमावांकडून संताप व्यक्त होत होता.

घटनास्थळी पोलीस सहाय्यक जयराम एकटेच हजर झाले. अपघातामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रहदारीतील अडथळा लक्षात घेता व पोलिसांची कमतरता भासल्याने पत्रकार व नागरिकांनी रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

अपघात प्रणव महामार्ग

बेळगाव-खानापूर महामार्गावरील वाढते अपघात पाहता हत्तरगुंजी क्रॉस ते गणेबैल, इदलहोंड क्रॉस ते गणेबैल तसेच प्रभुनगर चढतीचा भाग हे अपघात प्रणव ठिकान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे स्थानिक वाहनचालकांना याची जाणीव आहे. पण तालुक्याबाहेरील लोकांना या महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची कल्पनाच नसल्याने याठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.

थराकाप उडवणारा अपघात

महिनाभरापूर्वी प्रभूनगरनजीक दुचाकीवरून जाताना बेळगावच्या तीन युवकांचा झालेला अपघात ताजी असतानाच सोमवारी झालेला भीषण अपघात थरकाप उडवणारा ठरला आहे, असे अपघात वारंवार घडत असल्याने या महामार्गाचे चौपदरीकरण कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.

जागीच ठार झालेला रमेश ताशीलदार यांचा मृतदेह खानापूर शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे. दामोदर यांच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.