|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा डेअरीची आमसभा तहकूब

गोवा डेअरीची आमसभा तहकूब 

प्रतिनिधी/ फोंडा

गोवा डेअरीची प्रचंड गदारोळात सुरू करण्यात आलेली काल रविवारची वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांनी केलेल्या मागणीनुसार तहकूब करण्यात आली. गोवा डेअरीवर नेमण्यात आलेले प्रशासक दामोदर मोरजकर यांच्या उपस्थितीत सभा सुरू व्हावी असा तगादा सभासदांनी लावला आणि डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलेल्या सभेला आक्षेप घेतला. त्यानंतर साहाय्यक उपनिबंधकांनी पुढील सोपस्कर पूर्ण करताना सभा स्थगित करून सदर सभा तीस दिवसांच्या आत घेण्यात यावी असा आदेश दिला आहे.

काल रविवारी कुर्टी येथील गोवा डेअरी सभागृहात अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली ही सभा सुरू करण्यात येताच सभासदांनी आक्षेप घेतला. सहकार निबंधकांनी नेमणूक केलेले प्रशासक दामोदर मोरजकर यांनी डेअरीतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी व त्यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा व्हावी असा तगादा सभासदांनी लावला. त्यामुळे ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याची माहिती साहाय्यक उपनिबंधक पंकज मराठे यांनी दिली.

नवसू सावंत यांच्यावर प्रश्नांचा भडिमार

सभासदांच्या गदारोळात काही सभासदांनी ज्यांच्याविरुद्ध निलंबनाचा आदेश देण्यात आला आहे त्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत यांच्यावर प्रश्नाचा भडिमार करून त्यांना जेरीस आणले. 

नव्या आदेशानुसार ही वार्षिक सर्वसाधारण सभा चतुर्थीनंतर येत्या 30 सप्टेबर रोजी घेण्यात येण्याची शक्यता आहे. सभा तहकूब करण्याबाबत तब्बल दीड तासाच्या गदारोळात ही चर्चा करण्यात आली. यावेळी सहकार निबंधकांनी अपात्र ठरविलेल्या सातही संचालकांसह अन्य संचालक व विविध सोसायटीचे प्रतिनिधीत्व करणारे सुमारे शंभराहून अधिक सभासद उपस्थित होते.

आज सोमवारी गोवा डेअरी कारभाराचा ताबा संजीवनी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक असलेले दामोदर मोरजकर स्वीकारण्याची अशक्यता आहे.

प्रशासकांच्या उपस्थितीत व्हावी सभा

काल तहकूब झालेल्या आमसभेत सहकार खात्याचे संशयाच्या घेऱयात असलेले साहाय्यक यांची उपस्थिती राहिल्याने काही सभासदांनी राग व्यक्त केला. सहकार निबंधकाने घोटाळेखोराविरोधात अपात्रता व व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत यांना निलंबनाचे आदेश दिले आहे. प्रशासकांच्या अनुपस्थितीत सुरू करण्यात आलेली वार्षिक सर्वसाधारण सभा प्रशासकांच्या उपस्थितीत सुरू व्हावी अशी मागणी सभासदांनी केल्याने सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आल्याची माहिती सत्यशोधक समितीच्या पदाधिकाऱयांनी दिली.

सत्यशोधक समिती अभिनंदनास पात्र

गोवा डेअरी भ्रष्टाचारमुक्त झाल्यास पशुखाद्य दरात कपात तसेच राज्यात दूध स्वस्त दरात उपलब्ध होण्याची शक्यता सत्यशोधक समितीने वर्तविली आहे.  2017 सालच्या सर्वसाधारण सभेत नियुक्त करण्यात आलेल्या सत्यशोधक समितीने चांगली कामगिरी करताना सगळया घोटाळेखोरांना उघडे पाडले. त्यासंबंधी शेवटपर्यत लढा सुरू ठेवल्याने ही कारवाई शक्य झाल्याची प्रतिक्रिया काही शेतकऱयांनी यावेळी दिली. सत्यशोधक समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद सावर्डेकर, जयंत देसाई यांनी सहकार निबंधक व सरकारचे अभिनंदन केले आहे