|Saturday, July 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बदललेल्या बालसाहित्याचे केंद्र ‘किशोर ’

बदललेल्या बालसाहित्याचे केंद्र ‘किशोर ’ 

आज किशोरचे 75 हजार वर्गणीदार आहेत. मागील 4 वर्षात राज्यस्तरावरील सुमारे 20 पुरस्कार किशोर दिवाळी अंकास मिळाले आहेत. किशोरने 1971 सालातील  पहिल्या अंकापासूनचे सर्व अंक मोफत ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत..

एखाद्या नियतकालिकाचा संपादक कोण आहे, त्याचा लेखनाबाबतचा दृष्टीकोन काय आहे, यातूनच त्या नियतकालिकाची मुळे त्या भाषेच्या मातीत रूजत जाण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत असतो. बालभारतीच्या किशोर मासिकाने आजवर अनेक लेखक, कवी, चित्रकार घडले. मात्र गेल्या चार वर्षात हे मासिक अधिकाधिक वाचप्रिय झाले. याच काळात किशोरमध्ये त्याच त्याच दिसणाऱया लेखकांच्या नावांची मक्तेदारी मोडीत निघाली. चांगले बालसाहित्य लेखन करणाऱया नव्या लेखक-कवींना स्थान मिळू लागले. अर्थात हे सारे घडले ते किरण केंद्रे या नव्या तरुण किशोरच्या संपादकामुळे! संपादकाचे सर्वसामान्यांशी नाते काय असते यावरच त्याची संपादकीय भूमिका विस्तारत जाते. श्री. केंद्रे सामान्यांशी नाते जपतात. त्याचेच प्रतिबिंब किशोर मासिकाच्या लेखन निवडीमध्ये पडलेले दिसते. अर्थात हे त्यांच्या लेखन निवडीबद्दल झाले. पण किशोरने वाचकांपर्यंत पोहचण्याचीही मर्यादा ओलांडली. त्यासाठी श्री. केंद्रे यांनी वेगवेगळय़ा नव्या संकल्पना राबवल्या. किशोरचा हा बदल नव्याने गुणोत्तम बालसाहित्य लिहिणाऱया लेखकांसाठी सुखावणारा आहे!

महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीत किशोर मासिकाचे स्वतंत्र स्थान आहे. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत हा उद्देश ठेवून 1971 साली   बालभारतीने किशोर मासिक सुरू केले. मागील 47 वर्षात किशोर मासिकाने अनेक पिढय़ांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे, मूल्यांचे संस्कार केले. किशोरला कलात्मक मांडणी आणि आशय संपन्नतेचे अधि÷ान दिले ते पहिले संपादक वसंत शिरवाडकरांनी. गोष्टी, कवितांसोबत रंगीत चित्रे, रेखाटणे वापरण्याची प्रथा ‘किशोर’ने पहिल्या अंकापासून पाडली. वसंत शिरवाडकरांनंतर हरहुन्नरी लेखक वसंत सबनीस आणि त्यानंतर ज्ञानदा नाईक या संपादकांनी ‘किशोर’ची ध्वजा आणखी उंचावली. हे खरेच आहे, हा किशोरचा इतिहास आहे. तो नाकारून चालणार नाही. पण काळाचे एक भान असते ते कमी संपादकांना लाभते.

मात्र ‘किशोर’चे आताचे संपादक किरण केंदे यांनी नवीन सदरे आणि रंजक उपक्रमांची परंपरा कायम राखत आता किशोर अधिक कालानुरूप प्रसिद्ध करण्याला प्राधान्य दिले आहे. श्री. केंद्रे हे मंत्रालयात अधिकारीपदावर कार्यरत होते. पण ‘मंत्रालयातील पदाच्या मोहातून’ बाहेर पडत त्यांनी सप्टेंबर 2014 मध्ये किशोरच्या संपादकीय पदाची जबाबदारी स्वीकारली. मुलांसाठी काम करण्याचा ध्यास आणि कोवळय़ा वयातील लेखन जाणिवांचा विस्तार याच भावनेने त्यांनी मंत्रालयातील सदर नोकरी सोडून किशोरचे संपादकीय पालकत्व स्वीकारले असल्याचे त्यांच्याशी चर्चा करताना जाणवत राहते. किशोरचा वारसा मोठा असल्याने साहजिकच तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी श्री. केंद्रे यांच्याकडे होती.  विशिष्ट वयातील मुले डोळय़ासमोर ठेवून त्यांच्या जडणघडणीसाठी किशोरच्या माध्यमातून काय करता येईल याचे नियोजन केले. साधारण एखादे मूल जर आता पहिलीला असेल तर ते दहावीला जाईपर्यंत आपल्याला त्याला काय काय देता येईल असा दहा वर्षाचा आराखडा तयार केला. या पार्श्वभूमीवर मुलांना लिहिण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यासाठी चार पाने राखीव ठेवली. यामुळेच आज किशोरमध्ये मुले विविध वाङ्मयप्रकारांची तोंडओळख व्हावी म्हणून कथा, कविता, लघुकथा, दीर्घकथा, नाटिका, निबंध, ललित लेखन, नाटय़छटा इ. साहित्य प्रकार हाताळताना दिसतात. परंतु याचबरोबर श्री. केंद्रे यांनी लेखनाची नवीन सदरे सुरू करताना मुलांची सर्जनशीलता वाढीस कशी लागेल, याचा प्राधान्याने विचार केला. त्यात बालचित्रपटविषयक ‘पिक्चरची फॅक्टरी‘, जगभरातील गाजलेल्या बालकथांचे भाषांतर असणारी ‘देशांतर’ ही मालिका, धम्माल मस्ती करणाऱया मुलांची ‘मोबाईल गँग‘, व्यक्तिमत्त्व विकासावर ‘घडवा स्वतःला, फुलवा स्वतःला’, ‘संगणक आपला मित्र’, वाचनसंस्कृती रुजवणारी ‘काय वाचाल’? कसे वाचाल?, किटकांचे अद्भुत विश्व उलगडून दाखवणारी ‘किटकांची शाळा’, गुप्तहेरांच्या अनोख्या जगाची सफर असणारी ‘गुप्तहेर कथा’ आदी नवीन सदरे-मालिकांचा समावेश असून आपण या सदरांची शिर्षके जरी लक्षात घेतली तरी श्री. केंद्रे यांना किशोरच्या माध्यमातून नेमके बालवाचकांपर्यंत काय पोहचवायचे आहे, हे आपल्या लक्षात येते. साहित्य प्रकाशित होण्याची संधी न मिळणाऱया विविध भागातील लेखकांना किशोरमध्ये आपले साहित्य प्रकाशित होणे हे प्रतिष्ठेचे वाटत आले आहे. कारण कोणतेही असो पण आपले साहित्य किशोरमध्ये प्रकाशित होऊ शकले नाही याची खंत आजवर अनेकांच्या मनात होती. मात्र मागील चार वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील नवोदित लेखक कवींना केंद्रे यांनी किशोरमध्ये संधी उपलब्ध करून दिली. यासाठी त्यांनी गुणवत्ता हा एकच निकष मानला. केवळ अंकातील आशय चांगला असून चालत नाही, त्याची मांडणीही आकर्षक असणे आवश्यक असते. त्यामुळे किशोरच्या मांडणीतील नवा बदलही लक्ष वेधून घेणारा आहे. मुलांना असे साहित्य अधिक भावते. त्यामुळे अंकाच्या ले आउट डिझाइनबाबत सध्या सतत दक्षता बाळगली जात आहे.

केंद्रे यांनी आर्ट स्कूलमधून नव्याने बाहेर पडणाऱया विद्यार्थ्यांना किशोरशी जोडून घेतले. त्यामुळे ताजी आणि नव्या काळाशी सुसंगत चित्रे किशोरमधून प्रसिद्ध होऊ लागली. प्र्रत्येक मुखपृ÷ बोलके आणि कलात्मकदृष्टय़ा सरस राहील, असा प्रयत्न असतो. जुन्या-नव्या चित्रकारांकडून हे काम करून घेतले जाते. तसेच विविध पातळय़ांवर प्रयत्न केल्याने वर्गणीदारांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. आजघडीला किशोरचे 75 हजार वर्गणीदार आहेत. किशोरच्या प्रसिद्धीसाठी समाजमाध्यमांचा उपयोग त्यांनी केला. अर्थात या सगळय़ाचे फलित म्हणून मागील चार वर्षात राज्यस्तरावरील सुमारे 20 पुरस्कार किशोर दिवाळी अंकास मिळाले आहेत. किशोरने डिजिटलायझेशनचा मोठा प्रकल्प हाती घेतला. 1971 सालातील  पहिल्या अंकापासूनचे सर्व अंक मोफत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

बदलणाऱया मुलांचे भावविश्व  हेरत त्यांच्या सर्जनशील मनावर संस्कार करण्याचा किशोरचा वसा कायम राखण्याचा प्रयत्न आजही सुरू आहे आणि तो राखताना समकाळाला समजून घेऊन लिहिणाऱया लेखकाच्या लेखनाला अग्रक्रम देणे हा श्री. केंद्रे यांचा प्राधान्यक्रम आहे. त्याला वाचकांचा ‘आजपेक्षा उद्या अधिक’ प्रतिसाद मिळत राहो याच शुभेच्छा!

अजय कांडर