|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अन् जिल्हाधिकाऱयांनी पालिकेला फटकारले

अन् जिल्हाधिकाऱयांनी पालिकेला फटकारले 

  ओढा गळपटण्याचा पालिकेचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी हाणून पाडला

प्रतिनिधी/ सातारा

व्यकंटपुरा पेठेत किल्ले अजिंक्यताऱयाकडून आलेला ओढा बुजवून त्याच ओढय़ाचे रुपांतर नाल्यात करण्यात आले आहे. त्याच नाल्यावर काम करण्यासाठी सातारा पालिकेने घाट घालत सुमारे 2 लाख 56 हजार 150 रुपयांचे काम मंजूर केल्याची बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली. जिल्हाधिकाऱयांनी सर्व पुरावे पाहुन म्हणणे ऐकून घेत तो पालिकेने घेतलेला ठराव रद्द करण्याचे आदेश देत पालिका प्रशासनाला चांगलेच फटकारल्याची माहिती सजग सामाजिक संस्थेचे अमित शिंदे यांनी दिली.

सातारा पालिकेत घेण्यात आलेल्या 4 डिसेंबर 2017 रोजीच्या स्थायी समितीत ठराव नंबर 356 वा तर विषय क्रमांक 96 वा प्रभाग क्रमांक 18 मध्ये व्यकंटपुरा पेठेतील सिटी सर्व्हे नंबर 63 गाढवे घर ते सिटी सर्व्हे नंबर 64 माने घर या दरम्यान गटरवर स्लॅब करणे, रस्ता करणे या कामासाठी 2 लाख 56 हजार 150 रुपयांच्या कामास मंजुरी देण्याच्या विषयासाठी सुहास राजेशिर्के हे सुचक तर अनुमोदक यशोधन नारकर हे होते. हा विषय मंजूर केल्यानंतर पालिका प्रशासनाने हे काम ठेकेदाराकडून करवुन घेण्यासाठी 3 मार्च 2018 ला निविदा प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर नगरपरिषद कायदा कलम 1985 च्या 308 नुसार जिल्हाधिकाऱयांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यावर 18 रोजी सुनावणी झाल्यानंतर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. पालिकेच्या कारभाराबाबत त्या ओढय़ाचे नकाशासह पुरावे जिल्हाधिकाऱयांकडे सादर केले.

मुख्याधिकाऱयांना खडसावले

जिल्हाधिकऱयांनी म्हणणे ऐकून घेताना चांगलेच पालिकेच्या मुख्याधिकारी यांना खडसावले. ओढा आहे हे मान्य करा, नकाशात ओढा दाखवला जातोय, उद्या पाऊस जादा झाल्यानंतर नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास त्याला जबाबदार कोण?, असा जाब विचारला. त्यावर त्यांनी तुम्ही लेखी द्या ओढा नाही असा, अशी मागणी करताच, मुख्याधिकारी गोरे, अभियंता भाऊ पाटील यांना उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी निकाल दिला आहे. लोकांच्या खिशातील पैशाचा होणारा चुराडा टळला आहे. असे अमित शिंदे यांनी सांगितले.