|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लोकअदालतीत 5,279 खटले निकालात 6 कोटी 26 लाखांची देवघेव

लोकअदालतीत 5,279 खटले निकालात 6 कोटी 26 लाखांची देवघेव 

प्रतिनिधी/ बेळगाव

न्यायालयातील प्रलंबित खटले तसेच नव्याने दाखल झालेले लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. यामधून अनेक खटले निकालात काढुन पक्षकारांना दिलासा दिला जातो. शनिवार दि. 8 रोजी आयोजित केलेल्या लोकअदालतीत तब्बल 5 हजार 279 खटले निकालात काढुन 6 कोटी 26 लाख 11 हजार 968 रुपयांची देवघेव झाली आहे.

न्यायालयात खटले दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल कधी लागेल. याची शाश्वती नसते. पक्षकारांना न्यायालयाचे हेलपाटे खावे लागतात. याचबरोबर वकीलांनाही आपल्या पक्षकाराच्या प्रत्येक खटल्याला उपस्थित रहावे लागते. खटला निकालात लागण्यासाठी बराच उशीर लागत असतो. त्यामुळे ते खटले तातडीने निकालात काढण्यासाठी लोकअदालत भरविण्यात येते. या लोकअदालतीला उत्स्फुर्त प्रतिसादही मिळू लागला आहे.

या लोकअदालतीमध्ये बँक, सोसायटी, फायनान्स व खासगी देवघेवीचे खटले दाखल केले जातात. याचबरोबर चेकबॉन्स, विमा रक्कम, हेस्कॉम, बीएसएनएल, रक्कम वसुलीचे खटलेही निकालात काढले जातात. महत्वाचे म्हणजे या लोकअदालतीमध्ये कौटुंबिक खटलेही निकालात काढले जात आहेत. त्यामुळे पक्षकारांना दिलासा मिळू लागला आहे. सध्या संपूर्ण जिह्यामध्ये महिन्याच्या दुसऱया शनिवारी ही अदालत भरविली जात आहे. त्यामध्ये प्रलंबित व सध्या दाखल झालेले खटले निकालात काढले जावू लागले आहेत.

शनिवारी झालेल्या लोकअदालतीमध्ये 15 हजार 125 प्रलंबित खटले निकालासाठी घेण्यात आले होते. त्यामधील 4 हजार 568 खटले निकालात काढण्यात आले. त्यामधून 4 कोटी 92 लाख 69 हजार 318 रुपये देवघेव झाली. तर नव्याने दाखल झालेल्या 5 हजार 247 खटल्यांमधील केवळ 711 खटले निकालात काढले गेले. त्यामधून 1 कोटी 33 लाख 42 हजार 650 रुपयांची देवघेव झाली आहे. असे एकूण 5 हजार 279 खटले निकालात काढुन 6 कोटीहून अधिक रुपयांची देवघव झाली आहे.

या लोकअदालतीचे उद्घाटन मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जे. सतीश सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकअदालतीमध्ये बहुसंख्य न्यायालयाचे न्यायाधीश खटले निकालात काढण्यासाठी उपस्थित होते. याचबरोबर वकील व पक्षकारही उपस्थित होते. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा कायदा सेवा प्राधिकार सचिव किरण किणी यांनी प्रयत्न केले.

Related posts: