|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाईनशॉपमध्ये चोरटय़ांचा धाडसी दरोडा

वाईनशॉपमध्ये चोरटय़ांचा धाडसी दरोडा 

वार्ताहर/ अथणी

अथणी-विजापूर राज्यमार्गावरील ऐगळी क्रॉसजवळ असलेल्या सागर वाईनशॉपमध्ये व्यवस्थापकाला बांधून घालून चौघा चोरटय़ांनी धाडसी दरोडा टाकला. ही  घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या दरोडय़ामध्ये चोरटय़ांनी 1.34 लाखाच्या रोख रकमेसह दारू व बिअर बाटल्या असा 2 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. रहदारीच्या ठिकाणी असा धाडसी दरोडा पडल्याने संबंधितांचाच यात हात असल्याचा पोलिसांचा संशय बळावला असून परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ऐगळी क्रॉस हे नेहमी गजबजलेले ठिकाण  आहे. येथे सागर वाईनशॉप असून शुक्रवारी रात्री वाईनशॉप व्यवस्थापकाने बंद करून तो तेथेच झोपी गेला. यानंतर मध्यरात्री वाहनातून आलेल्या अंदाजे पंचवीस ते तीस वयोगटातील चौघा चोरटय़ांनी वाईनशॉपला लक्ष करत शॉपचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. झोपी गेलेल्या व्यवस्थापकाचे हात-पाय बांधून त्याच्या तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर शॉपमधील 1.34 लाख रोख रक्कम तसेच दारू व बिअरच्या बाटल्या लंपास करत वाहनातून पलायन केले.

दरम्यान व्यवस्थापकाने धडपड करत आपल्या तोंडातील बोळा काढला व आरडाओरड केली. आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व बंदीस्त व्यवस्थापकाची सुटका केली. व्यवस्थापकाने सर्व माहिती नागरिकांना दिली. शनिवारी सकाळी ऐगळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर अथणी विभागाचे डीवायएसपी रामान्ना बसरगी, सीपीआय एच. शेखरप्पा यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर दरोडय़ाबाबत पोलीस वरिष्ठ अधिकाऱयांना माहिती दिल्यानंतर रविवारी सायंकाळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र गडादी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर महाराष्ट्र व विजापूर येथे पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याचे समजते. सदर घटनेची नोंद ऐगळी पोलिसात झाली असून अधिक तपास होत आहे.

गजबजलेल्या ठिकाणी मारला डल्ला

ऐगळी क्रॉसवर 160 कुटुंबे वास्तव्यास आहेत. गजबजलेल्या ठिकाणी 24 तास वाहतूक सुरू असते. रात्रीच्यावेळी जाणाऱया बसेसचा थांबा या क्रॉसवरच आहे. असे असताना सदर दरोडा पडलाच कसा? तसेच या दरोडेखोरांना कोणीतरी मदतच केली असल्याचा संशय असून याविषयी परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.