सागरतीर्थ येथे टॉयलेट, चेजिंग रुमला आग

वार्ताहर/ वेंगुर्ले
सागरतीर्थ ग्रामपंचायतने वर्षापूर्वी दोन लाखाच्या निधीतून खरेदी केलेल्या दोन फायबर टॉयलेट व तीन चेंजिंग मोबाईल रूम तीन महिन्यापूर्वी समुद्र किनाऱयावर ठेवले होते. त्यांना अज्ञाताने आग लावून त्या जाळून टाकल्याची घटना मंगळवारी उघड झाली. यासंदर्भात ग्रामसेवक ममता रामचंद्र कदम यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या निर्मल सागर तट योजनेतून सागरतीर्थ ग्रामपंचायतीने वर्षापूर्वी 2 लाख रुपयांच्या निधीतून 2 फायबर टॉयलेट व 3 चेंजिंग रूम खरेदी केले होते. त्याला सोमवारी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते मंगळवार 11 सप्टेंबर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने आग लावून जाळून टाकले. त्यामुळे ग्रामपंचायतचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 व 4 तसेच भा. दं. वि. 435 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास शिरोडा पोलीस ठाण्याचे गजेंद्र भिसे करीत आहेत.